जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणारे टॉप-10 देश; भारताचा कितवा क्रमांक..? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:23 IST2026-01-02T13:21:44+5:302026-01-02T13:23:55+5:30
Largest Arms Importing Countries: जगातील शस्त्रास्त्र खरेदी करणाऱ्या देशांमध्ये युक्रेन पहिल्या क्रमांकावर आहे.

जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणारे टॉप-10 देश; भारताचा कितवा क्रमांक..? जाणून घ्या
Largest Arms Importing Countries: स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या ताज्या अहवालात जागतिक शस्त्रास्त्र व्यापारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अहवालानुसार, 2020 ते 2024 दरम्यान युक्रेन जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार म्हणून उदयास आला आहे. फेब्रुवारी 2022 पासून रशियासोबत सुरू असलेल्या युद्धानंतर युक्रेनला मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्याची गरज भासू लागली. युद्धापूर्वी युक्रेनची शस्त्र आयात मर्यादित होती, मात्र संघर्षानंतर अमेरिका, जर्मनी, पोलंडसह 35 पेक्षा अधिक देशांकडून शस्त्रे आयात करण्यात आली. यामध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक आहे.
या अहवालानुसार, भारताने जागतिक शस्त्र आयातीत 8.3 टक्के वाट्यासह दुसरे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, भारत कोणत्याही मोठ्या युद्धात सामील नसतानाही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रसज्जतेवर भर देत आहे. भारतासाठी रशिया, फ्रान्स आणि इस्रायल हे प्रमुख शस्त्र पुरवठादार देश आहेत. मात्र SIPRI ने हेही स्पष्ट केले आहे की, भारताची शस्त्र आयात पूर्वीच्या तुलनेत घटली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारताने स्वदेशी संरक्षण उत्पादनावर दिलेला भर.
स्वदेशी संरक्षण उत्पादनामुळे आयातीत घट
SIPRI च्या अहवालानुसार, 2015-2019 या कालावधीच्या तुलनेत भारताच्या शस्त्र आयातीत सुमारे 9 टक्क्यांची घट झाली आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमतेत झालेली वाढ हे यामागील प्रमुख कारण आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, तेजस लढाऊ विमान आणि आधुनिक तोफ प्रणाली ही याची ठळक उदाहरणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खाडी देश आणि पाकिस्तानही आघाडीवर
या यादीत कतार तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने एकूण 6.8 टक्के शस्त्र आयात केली आहे. सौदी अरेबिया चौथ्या, तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान प्रामुख्याने चीन, तुर्किये आणि नेदरलँड्सकडून शस्त्रे आयात करतो.
टॉप-10 शस्त्र आयात करणारे देश (2020-2024)
SIPRI च्या यादीत युक्रेन आणि भारतासोबतच जपान, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, अमेरिका आणि कुवैत यांचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार असलेला अमेरिका स्वतःही शस्त्र आयात करणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये आहे.
युरोपमध्ये शस्त्र आयातीत मोठी वाढ
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, गेल्या चार वर्षांत युरोपीय देशांच्या शस्त्र आयातीत तब्बल 155 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामागे युक्रेन युद्ध आणि वाढत्या प्रादेशिक सुरक्षा चिंता ही प्रमुख कारणे असल्याचे SIPRI ने स्पष्ट केले आहे.