कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 22:04 IST2024-06-13T22:04:04+5:302024-06-13T22:04:47+5:30
या घटनेनंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी थेट कुवैत गाठले.

कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
Kuwait Fire : कुवेतच्या मंगाफ शहरातील एका सात मजली इमारतीत बुधवारी सकाळी भीषण आग लागली, ज्यामध्ये 45 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह जखमी भारतीयांना मदत करण्यासाठी आणि मृतदेह भारतात आणण्यासाठी कुवेतला पोहोचले असून, भारतीय वायुसेनेच्या विमानाद्वारे मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुवेतला पोहोचल्यानंतर कीर्तीवर्धन सिंह यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, अल-याह्या यांनी वैद्यकीय मदत, शक्य तितक्या लवकर मृतदेह परत आणण्यासह संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच कीर्तीवर्धन सिंग यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट दिली, जिथे सात जखमी भारतीय दाखल आहेत. कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांना भारत सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मृतांपेकी बहुतांश केरळमधील
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुवेतचे पहिले उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख फहद अल-युसेफ अल-सबाह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी 48 मृतदेहांची ओळख पटवली असून त्यापैकी 45 भारतीय आणि तीन फिलिपिनो आहेत. उर्वरित मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांपैकी बहुतांश केरळमधील आहेत.
घटनेनंतर भारत सरकार सक्रिय
बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा आणि इतरांशी कुवेत आगीच्या घटनेसंदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.