खैबर पख्तुनख्वामध्ये सरकारची हिंदू विवाह कायद्यात सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 05:50 IST2026-04-15T05:50:20+5:302026-04-15T05:50:40+5:30
Pakistan News: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने स्थानिक पातळीवर हिंदू विवाहांची नोंदणी प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करण्यासाठी हिंदू विवाह कायदा-२०१७ मध्ये दुरुस्ती केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

खैबर पख्तुनख्वामध्ये सरकारची हिंदू विवाह कायद्यात सुधारणा
पेशावर - पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने स्थानिक पातळीवर हिंदू विवाहांची नोंदणी प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करण्यासाठी हिंदू विवाह कायदा-२०१७ मध्ये दुरुस्ती केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
हिंदू विवाह (दुरुस्ती) कायदा २०२६-अंतर्गत, हिंदू समाजातील सदस्यांना विवाहांच्या औपचारिक नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हा स्तरावर विवाह नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सुधारित कायद्यातील कलम १ च्या अनुच्छेद २ मध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे विवाह नोंदणी अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम सुधारण्याचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती कायद्याच्या कलम ७ अंतर्गत केली जाईल. हिंदू समाजातील सदस्यांना सहजरीत्या चांगल्या सुविधा उलपब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा अधिक नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. स्थानिक प्रशासन किंवा सरकारला हिंदू विवाह नोंदणीसाठी परवाने जारी करण्याचे अधिकार देणे, तसेच संपूर्ण प्रक्रिया प्रभावी, सुलभ करणे हा या कायद्याचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले.