अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 08:06 IST2025-10-10T08:05:33+5:302025-10-10T08:06:47+5:30
Kabul blast : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एकापाठोपाठ एक शक्तिशाली स्फोट आणि गोळीबार. शहरात भीतीचे वातावरण. तालिबानने चौकशीचे आदेश दिले. या हल्ल्यामागे कोणाचा हात?

अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
काबुल: अफगाणिस्तानची राजधानी काबुल शुक्रवारी रात्री शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. एकापाठोपाठ एक झालेल्या अनेक स्फोटांमुळे आणि गोळीबारामुळे शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यांमध्ये किती जीवित व वित्तहानी झाली आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोशल मीडियावर अज्ञात विमानांनी हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री उशिरा काबुलच्या विविध भागांमध्ये स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सोशल मीडियावर काही लोकांनी अज्ञात विमानांनी हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
भारताच्या दौऱ्यादरम्यान हल्ला
विशेष म्हणजे, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी हे सध्या भारताच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. २०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर हा त्यांचा पहिलाच उच्चस्तरीय भारत दौरा आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, काबुलमध्ये हा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पाकिस्तानसोबत तणाव
दुसरीकडे, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला (TTP) आश्रय देत असल्याचा आणि त्यांच्या सीमेवर हल्ले करण्यासाठी मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या स्फोटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.