इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला! राजधानी तेहरान बॉम्बिंगनं हादरली; आतापर्यंत किती मृत्यू? काय सांगतात आकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:40 IST2026-03-27T17:38:48+5:302026-03-27T17:40:14+5:30
इराण आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, इस्त्रायलने इराणमधील शस्त्र निर्मिती केंद्रांवर आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला! राजधानी तेहरान बॉम्बिंगनं हादरली; आतापर्यंत किती मृत्यू? काय सांगतात आकडे?
मध्य-पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणवर जबरदस्त बॉम्बिंग केली. इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांसंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होण्यापूर्वीच इस्त्रायलने हे हल्ले केले. इराण आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, इस्त्रायलने इराणमधील शस्त्र निर्मिती केंद्रांवर आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
तेहरानमधील हल्ल्यांदरम्यान लेबनॉनची राजधानी बैरूतच्या आकाशातही धुराचे लोट दिसले. मात्र, यासंदर्भात इस्रायलने अधिकृत पुष्टी केलेली नाही. दरम्यान, इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी इस्त्रायली सैन्य सज्ज असून संपूर्ण देशात हवाई हल्ल्यांचे सायरन वाजत आहेत. याशिवाय, इराणनेही आखाती शेजारी देशांवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. कुवेत आणि संयुक्त अरब अमीरात दोन्ही ठिकाणी इराणमधून येणारी ड्रोन आणि मिसाइल्सची माहिती समोर आली आहे.
२,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकन जहाजांचा ताफा... -
कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी ताकद वाढवली आहे. सुमारे २,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकन जहाजांचा ताफा या क्षेत्राजवळ पोहोचला आहे. याशिवाय, शत्रूच्या भागात उतरून विमानतळ सुरक्षित करण्यात तज्ज्ञ असलेल्या '८२ व्या एअरबोर्न'च्या किमान १,००० पॅराट्रूपर्सना तातडीने तैनात होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
भीषण जीवितहानी -
या युद्धात आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली आहे. इराणमध्ये १९०० हून अधिक, तर लेबनॉनमध्ये ११०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलमध्ये १८ नागरिकांचा आणि लेबनॉनमध्ये ३ इस्त्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात १३ अमेरिकन सैनिक, वेस्ट बँकमध्ये ४ आणि आखाती देशांमध्ये २० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.