इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 00:00 IST2024-10-01T23:57:13+5:302024-10-02T00:00:35+5:30
Terrorist Attack In Israel: एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणने इस्राइलवर हल्ला चढवला असतानाच दुसरीकडे इस्राइलची राजधानी असलेल्या तेल अवीवजवळच्या जाफा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणने इस्राइलवर हल्ला चढवला असतानाच दुसरीकडे इस्राइलची राजधानी असलेल्या तेल अवीवजवळच्या जाफा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबाराचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराचाही आवाज ऐकू येत आहे. दरम्यान, हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इस्राइली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तेल अवीवजवळील जाऱा येथे झालेल्या या गोळीबारात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. हा हल्ला शहरातील जेरुसलेम स्ट्रीटवर झाला आहे. तसेच हा हल्ला करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती इस्राइलमधील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराची ही घटना मध्य इस्राइलमधील शहरातील लाइट रेल्वे स्टेशन जवळ घडली आहे. ट्रेनमधून उतरत असताना सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांना खात्मा केला. दरम्यान, परिसरामध्ये आणखी किमान एक दहशतवादी फिरत असल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे.