इस्रायलने गाझातील सर्व मदत थांबविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 09:16 IST2025-03-03T09:16:31+5:302025-03-03T09:16:42+5:30
गाझापट्टीवरील विस्थापितांसाठी केली जाणारी मदत व पुरवठा रोखण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासोबत समन्वय साधून घेतल्याची माहिती इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने दिली.

इस्रायलने गाझातील सर्व मदत थांबविली
तेल अवीव : युद्धामुळे विस्थापित झालेल्या गाझापट्टीवरील नागरिकांसाठी पाठवण्यात येणारी सर्व प्रकारची मदत व पुरवठा रविवारी इस्रायलकडून थांबविण्यात आला. युद्धबंदीच्या विस्तारासाठीचा नवीन प्रस्ताव स्वीकारला नाही, तर अतिरिक्त परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायल सरकारने हमासला दिला. इस्रायलच्या निर्णयावर जगभरातून टीका सुरू आहे.
इस्रायल सरकार नाजूक युद्धबंदी करार मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हमासने इस्रायलच्या धमकीनंतर केला आहे. मदत बंद करण्याचा इस्रायलचा निर्णय हा जबरदस्तीने वसुली करण्याचा डाव असून, एकप्रकारे युद्धबंदी कराराचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करत हमासने इस्रायलच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायल-हमास युद्धबंदीचा पहिला टप्पा शनिवारी संपला. यात वाढीव मानवतावादी मदतीचा देखील समावेश होता. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप दुसऱ्या टप्प्यातील चर्चेला सुरुवात झालेली नाही. गाझातील इस्रायल सैन्याची माघार व त्या बदल्यात डझनहून अधिक ओलिसांची सुटका यासंदर्भात दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार होती.
अमेरिकेच्या समन्वयातून रोखली मदत
गाझापट्टीवरील विस्थापितांसाठी केली जाणारी मदत व पुरवठा रोखण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासोबत समन्वय साधून घेतल्याची माहिती इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने दिली.