'...तर आम्ही युद्ध थांबवू', मोदींसोबतच्या चर्चेत इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितला संघर्ष थांबवण्याचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 21:42 IST2026-03-21T21:41:46+5:302026-03-21T21:42:56+5:30
Iran War: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसोबत आखाती देशातील तणावावर चर्चा केली. यादरम्यान, इराणच्या राष्ट्रपतींनी या युद्धाची सुरुवात इराणने नव्हे तर अमेरिका आणि इस्राइलने केल्याचे सांगत युद्ध थांबवण्याचा मार्गही सांगितला.

'...तर आम्ही युद्ध थांबवू', मोदींसोबतच्या चर्चेत इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितला संघर्ष थांबवण्याचा मार्ग
अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला आज २२ दिवस लोटले आहेत. मात्र या कालावधीत हे युद्ध अधिकाधिक भीषण होत चालले असून, हा संघर्ष थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही आहे. यादरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसोबत आखाती देशातील तणावावर चर्चा केली. यादरम्यान, इराणच्या राष्ट्रपतींनी या युद्धाची सुरुवात इराणने नव्हे तर अमेरिका आणि इस्राइलने केल्याचे सांगत युद्ध थांबवण्याचा मार्गही सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी सांगितले की, इराणने नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद आणि पारदर्शकतेला तयारी दर्शवली आहे. त्यात संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरील चर्चेचाही समावेश आहे. मोदींशी बोलताना पेजेश्कियान यांनी अमेरिका आणि इस्राइलने केलेली कारवाई अमानवी आणि अनैतिक असल्याचा आरोप केला. तसेच त्याचा तीव्र निषेध केला. त्याबरोबरच पश्चिम आशियामधील देशांमध्ये प्रादेशिक सहकार्याच्या माध्यमातून शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी बाह्य हस्तक्षेप नसलेली प्रादेशिक चौकट आखण्याचाही प्रस्ताव दिला.
यावेळी युद्ध थांबवण्याच्या पर्यायाबाबत इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितले की, या भागात शांतता प्रस्थापित करायची असल्यास अमेरिका आणि इस्राइलने त्यांच्याकडून होत असलेले हल्ले तत्काळ थांबवावेत, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची हमी द्यावी. त्याबरोबरच पेजेश्कियान यानी ब्रिक्स परिषदेमधील भारताच्या अध्यक्षतेचा उल्लेख करत पेजेश्कियान यांनी या संघटनेच्या माध्यमातून इराणविरोधाती हल्ले थांबवण्यासाठी प्रादेशिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.