इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:00 IST2025-06-30T19:58:43+5:302025-06-30T20:00:32+5:30

इलॉन मस्कची इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे.

Iran starlink ban spying law corporal punishment after Israel attack | इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 

इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 

इराण आणि इस्त्राईलमध्ये युद्धविराम झाला असला तरी, इराणच्या मनात अजूनही भीती कायम आहे. इराणला अजूनही हेरगिरीचा धोका जाणवत असल्याने इराणने एक नवा फतवा जारी केला आहे. यानुसार, जर देशात कोणीही इलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा वापर केला, तर त्याला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली जाईल. याशिवाय त्याला दंड भरावा लागेल आणि तुरुंगातही जावे लागू शकते.

अलीकडेच इराणच्या संसदेने अमेरिकन कंपनी स्टारलिंकच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यासाठी मतदान केले. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. हेरगिरीचे नियम अधिक कडक करण्यासाठी इराणने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. इराणचे मत आहे की, इंटरनेट ब्लॅकआउट (Internet Blackout) दरम्यान, स्टारलिंक डिजिटल लाईफलाईन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ज्यामुळे पश्चिमेकडील देशांशी त्यांचे माहिती तंत्रज्ञान विकसित होऊन तेहरानच्या चिंता वाढू शकतात.

इराणच्या दृष्टीने स्टारलिंक म्हणजे धोका!
अमेरिकन इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर लावलेली बंदी या गोष्टीचा पुरावा आहे की, ही कंपनी जागतिक संघर्षांमध्ये कशी गुंतली आहे. अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यांनंतर, इराणचे हे पाऊल यावर प्रकाश टाकते की, सॅटेलाईट इंटरनेट आता आधुनिक युद्धाचे एक साधन बनले आहे. त्यामुळे इराणच्या दृष्टीनेही हे धोकादायक बनले आहे.

इराणने बनवला नवा कायदा
मस्कच्या इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे. यात स्टारलिंक वापरणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यासोबतच, या कायद्यात हेरगिरीसाठीही शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय, या कायद्यात अमेरिका आणि इस्त्राईलसारख्या देशांसाठी हेरगिरी करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. सायबर हल्ले, ड्रोन आणि इतर हानिकारक शस्त्रांचा वापर, परदेशी गुप्तचर संस्थांकडून निधी स्वीकारणे यांसारख्या कृत्यांसाठीही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

इराणमध्ये स्टारलिंकमुळे का खळबळ?
इस्त्राईलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी इलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘बीम चालू आहे’ (Beam is on) असा संदेश पोस्ट केला होता. याचा सरळ अर्थ असा होता की, इराणने इंटरनेट ब्लॅकआउट केला असला तरी, स्टारलिंकचे सॅटेलाईट इंटरनेट सुरू होते. तेहरानने इस्त्राईलच्या हल्ल्यांनंतर लगेचच डिजिटल संप्रेषण खंडित केले होते. असे असूनही स्टारलिंकचे इंटरनेट सुरू राहिल्याने इराणची ही बंदी कुचकामी ठरली.

इराणमध्ये ७०० हून अधिक लोकांना ताब्यात
इस्त्राईलच्या हल्ल्यांनंतर इराणने गेल्या आठवड्यात मोहीम राबवून अमेरिका आणि इस्त्राईलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ७०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. इराणच्या सरकारी मीडियानुसार, यापैकी किमान ६ लोकांना फाशी देण्यात आली आहे, ज्यात तीन कुर्द नागरिकही सामील आहेत. यांच्यावर इस्त्राईलच्या गुप्तचर संस्था मोसादला (Mossad) मदत केल्याचा आरोप आहे. याशिवाय, इराणने संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ बनवल्याच्या आरोपाखाली ५३ लोकांनाही अटक केली आहे.

Web Title: Iran starlink ban spying law corporal punishment after Israel attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.