इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:19 IST2026-01-02T14:18:11+5:302026-01-02T14:19:06+5:30
Iran Protest: सीमेपलीकडून आयात केलेली शस्त्रे आणि बंडखोर एजंटची माहिती याचे पुरावे सादर

इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
Iran Protest: अली खामेनी यांच्या सरकारने इराणमधील पाच दिवसांच्या अशांततेसाठी पाश्चात्य आंदोलकांना जबाबदार धरले आहे. खामेनींच्या सैन्याशी संलग्न गुप्तचर संस्थेने माध्यमांसमोर काही पुरावेही सादर केले आहेत. त्यात सीमेपलीकडून आयात केलेली शस्त्रे आणि बंडखोर एजंटची माहिती याचा समावेश आहे. इराणचा दावा आहे की पाश्चात्य देश या चळवळीच्या नावाखाली इस्लामिक राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाश्चात्य देशांतून बंदुका, शस्त्रे आणल्याचा आरोप
तस्निम न्यूज एजन्सीनुसार, खामेनी सैन्याने अमेरिका आणि इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करून निदर्शने भडकवणाऱ्या सात व्यक्तींना अटक केली आहे. कोणत्याही किंमतीत आंदोलन यशस्वी होऊ देणार नाही, असे इराणचे म्हणणे आहे. इराणच्या गुप्तचर संस्थेने आंदोलकांनी वापरलेल्या १०० बंदुका जप्त केल्या आहेत. गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे की या सर्व बंदुका सीमेपलीकडून आल्या होत्या. त्यामुळे इराणमध्ये ही शस्त्रे तस्करी करणाऱ्यांचा शोधही तपास यंत्रणा घेत आहेत. इराणचा दावा आहे की इराणमध्ये शस्त्रांची तस्करी करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे की ही सर्व शस्त्रे पाश्चात्य देशांमधून पाठवण्यात आली होती.
७ एजंटना अटक
इराणने ७ एजंटना अटक केली आहे. मेहर न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, अटक केलेल्यांपैकी ५ जण अमेरिकेतील गटांशी संपर्कात होते आणि इतर २ जण युरोपमधील गटांशी संबंधित होते. सर्वांची अधिक चौकशी केली जात आहे. इराणी सरकार हे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी काम करत आहे. खामेनी यांचे सल्लागार जनरल हुसेन अश्तारी यांच्या मते, इराणविरुद्ध एक मोठे षडयंत्र रचले जात आहे, जे समजून घेणे आवश्यक आहे. आंदोलनाच्या घोषणांमागे लपलेला शत्रूचा कट समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने राष्ट्रीय एकता राखली पाहिजे आणि सामाजिक विभाजन टाळले पाहिजे. कारण ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.