इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:52 IST2026-01-14T11:51:35+5:302026-01-14T11:52:01+5:30
२६ वर्षीय आंदोलक इरफान सुलतानी याला आज जाहीर फाशी दिली जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे.

इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?
इराणमध्ये गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेल्या सरकार विरोधी निदर्शनांनी आता अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. संपूर्ण देश आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, आतापर्यंत या संघर्षात २,५०० हून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच, २६ वर्षीय आंदोलक इरफान सुलतानी याला आज जाहीर फाशी दिली जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे.
इरफान सुलतानी: विना खटला फाशीची शिक्षा?
इरफान सुलतानी या तरुणाला ८ जानेवारी रोजी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. केवळ तीन दिवसांत, म्हणजेच ११ जानेवारीला इराण सरकारने त्याला दोषी ठरवले. त्याच्यावर 'मोहारेबेह' म्हणजेच 'देवाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा' गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, इरफानला स्वतःची बाजू मांडण्यासाठी वकीलही देण्यात आला नाही आणि कोणताही निष्पक्ष खटला न चालवता त्याला फाशी सुनावण्यात आली आहे. आज त्याला फाशी दिली जाऊ शकते, असे वृत्त 'द गार्डियन'ने दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा कडक इशारा आणि 'व्हाईट हाऊस'मध्ये खलबतं
इराणमधील या अत्याचारावर अमेरिकेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला असून, "जर आंदोलकांना फाशी दिली गेली, तर त्याचे परिणाम भीषण होतील," असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या आपल्या प्लॅटफॉर्मवर आंदोलकांना सरकारी इमारतींचा ताबा घेण्याचे आवाहन केले असून, "अमेरिकन मदत वाटेतच आहे," असे संकेत दिले आहेत. यामुळे अमेरिका इराणमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
३१ प्रांतांत आगीच्या ज्वाळा: मृतांचा आकडा नेमका किती?
इराणमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये निदर्शनांचा वणवा पसरला आहे. ६०० हून अधिक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. सीएनएनच्या मते मृतांचा आकडा २४०० पार गेला आहे, तर रॉयटर्सने हा आकडा २००० च्या आसपास असल्याचे म्हटले आहे. मात्र, 'इराण इंटरनॅशनल' या ब्रिटिश वेबसाइटने दिलेला आकडा अधिक धक्कादायक आहे. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या १७ दिवसांत तब्बल १२ हजार लोकांची हत्या करण्यात आली आहे. हा आधुनिक इराणच्या इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार असल्याचे बोलले जात आहे.
तरुणांचे टार्गेट आणि इंटरनेटवर बंदी
ठार झालेल्यांमध्ये बहुतांश तरुण ३० वर्षांखालील आहेत. इराणची 'रेव्होल्युशनरी गार्ड्स' आणि 'बसीज फोर्स' अत्यंत क्रूरपणे आंदोलकांना चिरडत असून, हे सर्व सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या आदेशावरून घडत असल्याचा आरोप आहे. जगाला इराणमधील खरी परिस्थिती कळू नये, यासाठी सरकारने संपूर्ण देशात इंटरनेट सेवा खंडित केली असून संवाद माध्यमे पूर्णपणे ठप्प केली आहेत.