नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:24 IST2025-09-30T16:23:41+5:302025-09-30T16:24:00+5:30
Indonesia School Collapse: इंडोनेशियामधील एका इस्लामिक शाळेमध्ये मोठी दुर्घटना घडली असून, शाळेची अधी बांधलेली इमारत कोसळून सुमारे ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. ही दुर्घटना जावा येथील एका शाळेत घडली आहे.

नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले
इंडोनेशियामधील एका इस्लामिक शाळेमध्ये मोठी दुर्घटना घडली असून, शाळेची अधी बांधलेली इमारत कोसळून सुमारे ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. ही दुर्घटना जावा येथील एका शाळेत घडली आहे. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, अजून ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी विद्यार्थी नमाज पढण्यासाठी एकत्र जमले होते. त्याचवेळी अचानक शाळेची इमारत मोठ्याने आवाज होऊन कोसळली. त्यामुळे शेकडो विद्यार्थी आत अडकले. तसेच मदतीसाठी या विद्यार्थ्यांनी एकच आक्रोश सुरू केला. या दुर्घटनेबाबत जावा पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आमची पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली. तसेच ७९ हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही दुर्घटना घडली तेव्हा घटनास्थळी किती लोक उपस्थित होते. याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सैनिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.
शाळेचे प्रमुख अब्दुल सलाम मुजीब यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेची इमारत आधी तीन मजली होती. तसेच आता चौथ्या मजल्यावर छत बांधण्याचं काम सुरू होते. दुर्घटना घडली तेव्हा कामगार तिसऱ्या मजल्यावर काँक्रिट घालत होते, असे त्यांनी सांगितले. या इमारतीच्या वरच्या मजल्यांचा वापर विद्यार्थ्याचे वर्ग आणि हॉस्टेल म्हणून केला जात होता. तर खालच्या मजल्यावर प्रार्थनेची खोली तयार करण्यात आली होती. दरम्यान, दुय्यम दर्जाचं साहित्य आणि बेकायदेशीर बांधामामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.