' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:40 IST2025-10-04T05:36:42+5:302025-10-04T05:40:56+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची रोखठोक भूमिका; म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना ओळखतो...’

' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
मॉस्को/सोची (रशिया) : अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी केले. मी पंतप्रधान मोदी यांना ओळखतो, भारतीय लोक कधीही अपमान सहन करत नाहीत, असेही पुतिन म्हणाले. दक्षिण रशियातील सोची येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल वाल्दाई डिस्कशन पॉलिसी फोरम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत पुतिन बोलत होते. या परिषदेत भारतासह १४० देश सहभागी झाले आहेत.
परिषदेला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांना ओळखतो. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाणारे निर्णय ते कधीच घेणार नाहीत. भारतीय लोक कधीच अपमान सहन करत नाहीत. भारतीय लोक त्यांच्या नेत्यांच्या निर्णयांवर लक्ष ठेवतात. हा देश कधीच कोणासमोर झुकण्याची इच्छा करीत नाही. त्यामुळेच मला खात्री आहे की, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही. भारताने रशियन तेलाची खरेदी थांबविली, तर त्याला १ ते १० अब्ज डॉलरचे नुकसान होईल, असा इशाराही पुतिन यांनी दिला. त्यामुळे ट्रम्प आता काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)
भारताकडून अधिक खरेदी करणार
दोन्ही देशांतील व्यापार असमतोलामुळे होणारे भारताचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश यावेळी पुतिन यांनी आपल्या प्रशासनास दिले. यामध्ये भारताकडून अधिक शेतीउत्पादने व औषधांची खरेदी करण्याचा समावेश असेल. त्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या प्रशासनास दिले. भारत मोठ्या प्रमाणात रशियन कच्चे तेल आयात करत असल्याने हा असमतोल निर्माण झाला आहे. येत्या डिसेंबरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणार असलेल्या वार्षिक शिखर परिषदेपूर्वी पुतिन यांनी ही घोषणा केली आहे.
तर तेल १०० डॉलरच्या पुढे
पुतिन यांनी म्हटले की, रशियाच्या व्यापारी भागीदारांवर उच्च टॅरिफ लादल्यास जगभरातील तेलाच्या किमतीवर परिणाम होईल. तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर जातील. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढवावे लागतील. अमेरिकी अर्थव्यवस्था मंदावेल. रशियाच्या तेलाविना जागतिक अर्थव्यवस्थेचेही नुकसान होईल.
भारत-रशिया सोव्हिएट काळापासूनचे मित्र
पुतिन म्हणाले की, रशिया-भारत संबंध सोव्हिएत काळापासून ‘विशेष’ आणि ‘मैत्रीपूर्ण’ राहिले आहेत. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय विषयांवर नेहमीच समन्वय साधत आले आहेत.
रशियाने युक्रेनवर ३८१ ड्रोन व ३५ क्षेपणास्त्रे डागली
किव्ह : रशियाने गुरुवारी रात्री युक्रेन सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या प्रकल्पावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात रशियाने ३८१ ड्रोन व ३५ क्षेपणास्त्रांचा वापर केला असून आजपर्यंतचा रशियाने केलेला हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.