जीव धोक्यात घालून ओलांडू नका इराणची सीमा, भारतीयांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:22 IST2026-03-17T07:21:37+5:302026-03-17T07:22:12+5:30
दूतावासाचे निवेदन, वाहतूक, स्थलांतराशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो

जीव धोक्यात घालून ओलांडू नका इराणची सीमा, भारतीयांना सूचना
दुबई : इराणमध्ये सध्या असलेल्या भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय कोणतीही सीमा ओलांडू नये, अशा सूचना भारताने सोमवारी जारी केल्या.
तेहरानमधील सद्य:स्थिती पाहता दूतावासाच्या माहिती व मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही सीमेद्वारे इराणमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांना वाहतूक व स्थलांतराशी संबंधित गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे या निवेदनात म्हटले आहे. इराणमधून बाहेर पडणाऱ्यांनी भारतीय दूतावासाला त्या संदर्भात स्पष्ट माहिती देणे वा त्यांच्याशी सतत संपर्कात असणे आवश्यक आहे. जे कोणी या सूचना न पाळता इराणच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना मदत करणे शक्य होणार नाही, असे या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.
यासंदर्भातील चौकशी किंवा आपत्कालीन मदतीसाठी दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. हेल्पलाइन: ९८-९१२ ८१० ९११५, ९८-९१२८१०९१०२, ९८-९१२८१०९१०९, ९८-९९३२१७९३५९, ई-मेल: cons.tehrant@mea.gov.in. इराणमधील भारतीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरून न जाता दूतावासाने दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करावे.
लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिण उपनगरातील 'दाहियेह' परिसरात इस्रायली हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचा ढिगारा आणि विखुरलेले अवशेष. या भीषण हल्ल्यामुळे परिसरातील रस्ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
इराणी नागरिकांची इराककडे धाव
युद्धामुळे दीर्घकाळ बंद असलेली इराण-इराक सीमा उघडताच रविवारी अनेक इराणी नागरिक स्वस्त अन्नधान्य खरेदी, इंटरनेटसाठी, नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी व रोजगाराच्या शोधात उत्तर इराकमध्ये दाखल झाले. इराकच्या कुर्द भागातून मालाने भरलेले ट्रक हाजी ओमेरान सीमेवरील चौकीमार्गे इराणकडे जाताना दिसले.
नेतान्याहूंचा पुन्हा व्हिडीओ; म्हणाले ‘मी जिवंत आहे’
सोशल मीडियावरील मृत्यूच्या अफवांना उत्तर देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी पुन्हा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओद्वारे ते जिवंत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे ९० सेकंदांच्या या व्हिडीओत नेतान्याहू जेरुसलेम हिल्स परिसरात लोकांशी संवाद साधताना दिसतात.
‘होर्मुजमधील हल्ले तत्काळ थांबवा’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुज सामुद्रधुनीत आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी चीनसह इतर देशांनी मदत करावी, अशा केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर चीनने या प्रदेशातील लष्करी हल्ले तत्काळ थांबवावेत, असे उत्तर दिले. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जिआय यांनी हॉर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे क्षेत्रिय शांतता, जागतिक स्थैर्यावर परिणाम झाला आहे, ऊर्जासंकटही उभे झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील लष्करी कारवाया थांबवण्याचे आवाहन केले.
हा संघर्ष वाढल्यास जागतिक आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. हल्ल्यांमुळे अनेक लष्करी, गुप्तचर आणि पोलिस ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत.