"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:18 IST2025-12-26T12:17:13+5:302025-12-26T12:18:13+5:30
रुग्णालयाच्या मोठ्या हलगर्जीपणामुळे ४४ वर्षीय भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला आहे.

"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
कॅनडातील एडमॉन्टनमधून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या मोठ्या हलगर्जीपणामुळे ४४ वर्षीय भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याने प्रशांत यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, परंतु इमर्जन्सी वॉर्ड 'वेटिंग एरिया'मध्ये त्यांना तब्बल ८ तास विनाउपचार बसवून ठेवलं गेलं, अखेर वेदना सहन न झाल्याने त्यांनी तिथेच जीव गमावला.
२२ डिसेंबर रोजी प्रशांत श्रीकुमार कामावर असताना त्यांना छातीत खूप वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या एका क्लाएटने त्यांना तातडीने एडमॉन्टनमधील 'ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटल'मध्ये नेलं. तिथे प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना वेटिंग रूममध्ये बसण्यास सांगण्यात आलं.
"बाबा, मला वेदना सहन होत नाहीत"
प्रशांत यांचे वडील कुमार श्रीकुमार माहिती मिळताच रुग्णालयात पोहोचले. त्यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांचा मुलगा वेदनेने विव्हळत होता. त्याने वडिलांना सांगितलं, "बाबा, मला खूप दुखतंय, आता वेदना सहन होत नाहीत." प्रशांत यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की, त्यांच्या वेदनांची तीव्रता '१० पैकी १५' या स्तरावर आहे. कर्मचाऱ्यांनी ईसीजी केला खरा, पण त्यात काहीही गंभीर नसल्याचं सांगून कुटुंबाला टाळलं. जसजसा वेळ गेला, तसतसा प्रशांत यांचं ब्लड प्रेशर वाढत गेलं. आरामासाठी रुग्णालयाने त्यांना केवळ 'टायलेनॉल' हे औषध दिलं.
८ तासांनी बोलावलं, पण तोपर्यंत...
प्रशांत यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८ तासांहून अधिक काळ वेटिंग एरियात थांबल्यानंतर त्यांना उपचारासाठी आत बोलावण्यात आलं. उपचार कक्षात जाऊन प्रशांत बसलाच होता, अवघ्या १० सेकंदात त्याने माझ्याकडे पाहिले, आपल्या छातीवर हात ठेवला आणि तो अचानक खाली कोसळला. परिचारिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 'कार्डिॲक अरेस्टमुळे प्रशांतचा मृत्यू झाला.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
प्रशांत यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ३, १० आणि १४ वर्षांची तीन लहान मुलं असा परिवार आहे. या घटनेने कॅनडातील इमर्जन्सी आरोग्य व्यवस्था आणि रुग्णांना वाट पाहाव्या लागणाऱ्या वेळेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. रुग्णालय चालवणारी संस्था 'कवनेंट हेल्थ'ने या प्रकरणावर सविस्तर भाष्य करण्यास नकार दिला आहे.