"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:34 IST2025-12-26T15:34:14+5:302025-12-26T15:34:56+5:30
कॅनडातील एका रुग्णालयात ४४ वर्षीय भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला.

"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
कॅनडातील एका रुग्णालयात ४४ वर्षीय भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला. एडमॉन्टन येथील 'ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटल'मध्ये ते उपचारांच्या वेटिंगमध्ये तडफडत होते, उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी ८ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेत आपल्या पतीला आणि कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या यातना मांडल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये निहारिका श्रीकुमार आपल्या पतीच्या मृतदेहासमोर उभ्या राहून त्यांच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरत आहेत. निहारिका यांनी सांगितलं की, प्रशांत श्रीकुमार यांना सोमवारी दुपारी १२ वाजता छातीत खूप दुखू लागलं आणि त्यांना १२:२० वाजता ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ते दुपारी १२:२० पासून रात्री साधारण ८:५० पर्यंत ते वेटिंग रुममध्ये बसून होते. त्या काळात ते सतत छातीत दुखत असल्याची तक्रार करत होते. त्यांचं ब्लड प्रेशर सतत वाढत होतं.
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
रुग्णालयाचा निष्काळजीपणा
निहारिका यांनी दावा केला की, ८ तासांच्या या वेटिंगदरम्यान त्यांच्या पतीला केवळ 'टायलेनॉल' हे औषध देण्यात आलं आणि कोणतीही मदत केली गेली नाही. त्या म्हणाल्या, "रुग्णालयाकडून सांगण्यात आलं की, छातीत दुखणं ही गंभीर समस्या मानली जात नाही. त्यांना कार्डियाक अरेस्ट वाटलं नाही." आठ तासांहून अधिक वेळ उलटल्यानंतर अखेर प्रशांत श्रीकुमार यांना उपचारासाठी इमर्जन्सी रूमध्ये नेण्यात आलं.
"खूप उशीर झाला होता"
प्रशांत यांना तिथे बसण्यास सांगण्यात आलं होतं. ते एका सेकंदासाठी उठले आणि कोसळले. ते बेशुद्ध झाले आणि मी नर्सला पल्स जाणवत नाहीत असं म्हणताना ऐकलं. नर्सनेही मदतीसाठी हाक मारली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि ३, १० आणि १४ वर्षांची तीन मुलं असा परिवार आहे.
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं"
"वास्तविक, रुग्णालय प्रशासन आणि ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या पतीला वेळेवर वैद्यकीय मदत न देऊन त्यांची हत्याच केली आहे. हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं. तिथली सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची वृत्ती इतकी कठोर होती की, परिस्थितीचं गांभीर्य समजून घेण्याऐवजी ते मलाच म्हणत होते, 'मॅडम, तुम्ही खूप रुड वागत आहात" असं निहारिका यांनी म्हटलं आहे.