अजून एका भारतीयाची लंडनमध्ये हत्या; तीन दिवसांत दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 18:13 IST2023-06-18T18:12:57+5:302023-06-18T18:13:34+5:30
लंडनमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन भारतीयांची हत्या करण्यात आली आहे.

अजून एका भारतीयाची लंडनमध्ये हत्या; तीन दिवसांत दुसरी घटना
Indian Killed in London : ब्रिटनमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन भारतीय नागरिकांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात अरविंद शशीकुमार (38) या भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेच्या अवघ्या दोन दिवस आधी लंडनमध्ये शिकणाऱ्या हैदराबादच्या 27 वर्षीय विद्यार्थिनीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.
या घटनेबाबत मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, भारतीय वंशाचे अरविंद शशीकुमार यांच्यावर साउथॅम्प्टन वे येथे चाकूने हल्ला करण्यात आला. शुक्रवारी पहाटे 1.31 वाजता त्यांचा जागीच मृत्यू झाला. 25 वर्षीय सलमान सलीमवर अरविंद यांच्या हत्येचा आरोप आहे. सलीमला पोलिसांनी अटक करून शनिवारी क्रॉयडॉन दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. तेथून न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी शशीकुमारचे पोस्टमॉर्टम करण्यात आले, ज्यामध्ये छातीत चाकू भोसकून हत्या केल्याचे समोर आले. या घटनेच्या दोनच दिवस आधी म्हणजे बुधवारी हैदराबादमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तेजस्विनी कुनथमवर चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. उत्तर लंडनमधील वेम्बली येथील नील किसंट येथे कुंथमवर गुंडांनी वार केले होते.