अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:52 IST2025-10-04T05:51:22+5:302025-10-04T05:52:14+5:30
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलंबियात दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हीरो आणि टीव्हीएससारख्या कंपन्यांचा गौरव केला.

अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
मेडेलिन (अमेरिका) : कुणाशी तरी हातमिळवणी आणि संगनमत करून नव्हे, तर भारतीय कंपन्या नवोन्मेष तसेच विविध शोधांच्या बळावर जागतिक पातळीवर विजय मिळू शकतात, अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलंबियात दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हीरो आणि टीव्हीएससारख्या कंपन्यांचा गौरव केला.
राहुल गांधी आपल्या चार देशांच्या यात्रेत सध्या अमेरिकेतील कोलंबियात असून, त्यांनी सोशल मीडियावर नुकतेच एक छायाचित्र शेअर केले. यात ते बजाज पल्सर दुचाकीच्या समोर उभे असल्याचे दिसत आहे. या भारतीय कंपन्या कोलंबियात करीत असलेल्या कामगिरीबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी मेडेलिनमध्ये ईआयए विद्यापीठात आयोजित एका परिसंवादात बोलताना सांगितले की, भारतात एक प्राचीन आध्यात्मिक परंपरा व एक विशिष्ट विचारप्रणाली आहे. आजच्या आधुनिक युगासाठी ती लाभदायी आहे. या माध्यमातून भारत जगाला खूप काही देऊ शकतो.
भारताबाबत आशावादी
राहुल यांनी आपण भारताबाबत खूप आशावादी असल्याचे सांगून भारतीय व्यवस्थेत काही कच्चे दुवे असल्याचे ते म्हणाले. यामुळे काही प्रमाणात जोखीम असली तरी भारताला त्यावर मात करावी लागेल, असे त्यांनी नमूद केले.
विविध धर्म, भाषेचा विचार
भारतात विविध धर्म आणि विविध भाषा ही एक जोखीम असल्याचे सांगून या विविध परंपरांची जोपासना करून त्यांना व्यक्त होण्यासाठी विशिष्ट स्थान देणे भारतासारख्या देशात महत्त्वाचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
चीनशी स्पर्धा हवी
अमेरिकेच्या वर्चस्वाला दिले जात असलेल्या आव्हानांबाबत म्हणाले की, भारताला लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून उत्पादनात चीनशी स्पर्धा करावी लागेल. रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्याची गरज आहे.
एआयमुळे नवा रोजगार
राहुल गांधी म्हणाले, आता केवळ एआयमुळे रोजगार नष्ट होतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे सांगून उलट यातून नवे रोजगारही उपलब्ध होतील. यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल, असे ते म्हणाले.