"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 09:10 IST2025-09-27T09:08:55+5:302025-09-27T09:10:00+5:30
Petal Gahlot And Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी 'राईट टू रिप्लाय' वापरून पाकिस्तानलादहशतवादावरून घेरलं.
पेटल गहलोत म्हणाल्या की, "सकाळी पाकिस्तानी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या दहशतवादाचं उदात्तीकरण केलं आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना "रेझिस्टन्स फ्रंट" चा बचाव केला, जी जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांच्या हत्येसाठी जबाबदार होती."
#WATCH | New York | Exercising the right of reply of India on Pakistan PM Shehbaz Sharif's speech, Indian diplomat Petal Gahlot says, "Mr President, this assembly witnessed absurd theatrics in the morning from the Prime Minister of Pakistan, who once again glorified terrorism… pic.twitter.com/ALR2AnDoA9
— ANI (@ANI) September 27, 2025
"ओसामा बिन लादेनला लपवून ठेवलं"
"हा तोच पाकिस्तान आहे ज्याने वर्षानुवर्षे ओसामा बिन लादेनला आश्रय दिला, लपवून ठेवलं आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचं नाटक केलं. त्यांच्या मंत्र्यांनी स्वतः कबूल केलं आहे की, पाकिस्तान अनेक दशकांपासून दहशतवादी तळ चालवत आहे.
"उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर..."
पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. "पाकिस्तानचे पंतप्रधान ज्या 'विजयाबद्दल' बोलत आहेत ते प्रत्यक्षात भारताने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या रनवेचे सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले फोटो आहेत. जर पाकिस्तानला हा विजय वाटत असेल तर तो त्यांना वाटू द्या" असं म्हणत गहलोत यांनी सडेतोड उत्तर दिलं.
"दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार"
"सत्य हे आहे की, भारतातील निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे आणि भारत नेहमीच आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल उचलेल. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील आणि यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही" असंही पेटल गहलोत यांनी म्हटलं आहे.