जिया उल हकने पाकिस्तानचे 'जिहादीफिकेशन' केले; बिलावल भुट्टोचा पाकिस्तानला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:18 IST2025-07-11T11:18:06+5:302025-07-11T11:18:30+5:30

India-Pakistan: माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान सरकारला आरसा दाखवला.

India-Pakistan: Zia ul Haq 'jihadified' Pakistan; Bilawal Bhutto slams Pakistan | जिया उल हकने पाकिस्तानचे 'जिहादीफिकेशन' केले; बिलावल भुट्टोचा पाकिस्तानला घरचा आहेर

जिया उल हकने पाकिस्तानचे 'जिहादीफिकेशन' केले; बिलावल भुट्टोचा पाकिस्तानला घरचा आहेर

India-Pakistan: पाकिस्तान पीपल्स पार्टीचे चेअरमन आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान सरकारला आरसा दाखवला. त्यांनी कुबूल केले की, 'जिहाद' पाकिस्तानच्या भूमीतून सुरू झाला. तसेच, पाकिस्तानचा माजी हुकूमशाह 'जिहादीफिकेशन' करण्यासाठी जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.

बिलावल यांनी गेल्या शुक्रवारी अल जझीरा टीव्हीला सांगितले होते की, लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहर सारख्या लोकांना भारताच्या स्वाधीन करण्यास पाकिस्तानला कोणताही आक्षेप नाही. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानातूच भरपूर टीका झाली. दरम्यान, आता द वायर वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बिलावल म्हणाले की, तुम्ही ज्या गटांबद्दल बोलत आहात (जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा) त्यांना पाकिस्तानबाहेर दहशतवादी हल्ले करण्याची परवानगी दिली नाही.

पहलगाम घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले
बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा पीडित म्हटले आणि सांगितले की, आम्ही दहशतवादामुळे ९२,००० लोक गमावले आहेत. मी स्वतः दहशतवादाचा बळी आहे. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याला दहशतवादी हल्ला, असा उल्लेख केला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे दुःख मला समजते, असे म्हटले. 

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, त्यांच्या देशाचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतः म्हटले होते की, आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना काश्मीरमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिले. यावर बिलावल म्हणाले, मला परवेझ मुशर्रफ यांच्या विचारांवर काहीही बोलायचे नाही. परंतु शीतयुद्धानंतर या प्रदेशाची धोरणे अशी बनली होती की, लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांना दहशतवादी संघटना मानले जात नव्हते. ९/११ पूर्वी या गटातील लोकांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले जायचे. पाकिस्तान सरकारने अशा संघटनांना अफगाणिस्तानात लढण्यासाठी पाठिंबा दिला. पण तरीही मी आणि माझी आई त्याच्या विरोधात होतो. 

झिया-उल-हकने जिहादीकरण केले
मुलाखतीदरम्यान बिलावलला विचारण्यात आले की, तुमचे वडील आसिफ अली झरदारी हेदेखील म्हणायचे की, आजचे दहशतवादी भूतकाळातील नायक आहेत. तुमच्या वडिलांनीही पाकिस्तानमध्ये दहशतवादी गटांची उपस्थिती मान्य केली होती. यावर बिलावल भुट्टो म्हणाले, मी भूतकाळापासून पळून जात नाही, परंतु आपण भूतकाळात अडकून वास्तवाकडे दुर्लक्ष करू नये. हुकूमशहा जनरल झिया-उल-हक याने पाकिस्तानचे 'जिहादीपिकेशन' केले. पाकिस्तानी गटांना किंवा व्यक्तींना अफगाणिस्तानच्या संदर्भात 'जिहाद' करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रशिक्षण दिले होते. ही भूतकाळातील गोष्ट आहे. हे भूतकाळात घडले आहे, असेही त्यांनी म्हटले.

Web Title: India-Pakistan: Zia ul Haq 'jihadified' Pakistan; Bilawal Bhutto slams Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.