PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:49 IST2025-05-18T14:49:28+5:302025-05-18T14:49:53+5:30
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले, पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ हेदेखील पीएम मोदींचे अनुकरण करताना दिसले.

PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
India-Pakistan Relation : पहलगाम हल्ला आणि भारताच्याऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. या ऑपरेशनच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यातील जवानांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. याशिवाय, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी सरकारने खासदारांच्या नेतृत्वाखाली सात शिष्टमंडळे स्थापन केली आहेत. यात खासदार आणि मंत्र्यांव्यतिरिक्त, माजी राजदूतांचा समावेश आहे. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताची नक्कल सुरू केली आहे. भारत जेजे काही करतोय, पाकिस्तान सरकार त्याची कॉपी करतंय.
पंतप्रधान शरीफ पाक सैनिकांना भेटले
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि भारतीय हवाई दलाच्या सैनिकांचे मनोबल वाढवले. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेदेखील पंतप्रधान मोदींचे अनुकरण करताना दिसले. त्यांनी त्यांचे लष्करी दौरे सुरू केले असून, पाक सैनिकांच्या भेटी घेत आहेत. पण, यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.
सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौरा करणार
पाकिस्तानने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची बाजू मांडेल. बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील समितीत माजी मंत्री खुर्रम दस्तगीर खान, हिना रब्बानी खार आणि माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांचा समावेश आहे.
भारतासारख्या बैठका बोलावलेल्या
भारताच्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) बैठकींची नक्कल करत पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NSC) बैठका बोलावल्या आहेत. ऑपरेशनची पद्धत, वेळ आणि लक्ष्य ठरवण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानाचीही शाहबाज शरीफ यांनी नक्कल केल्याचे दिसून आले.
पाकिस्तानमध्ये 16 भारतीय चॅनेल्सवर बंदी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. त्यानंतर खोटेपणा आणि प्रचाराचा प्रसार थांबवण्यासाठी भारताने डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज आणि जिओ न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी मीडिया प्लॅटफॉर्मसह 16 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याची नक्कल करत पाकिस्तानने 32 भारतीय वेबसाइट्सवर बंदी घातली.