Toronto Rath Yatra: कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांकडून भारतीयांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरु आहेत. कॅनडात खलिस्तानी नेते भारतीयांविरुद्ध गरळ ओकून धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत आहेत. अशातच टोरंटोमध्ये भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या रथयात्रा उत्सवात मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांवर अंडी फेकण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. इस्कॉनने आयोजित केलेल्या ५३ व्या वार्षिक रथयात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या सगळ्या घटनेची दखल घेत तिथल्या सरकारकडे हा मुद्दा मांडत कारवाईची मागणी केली.
पुन्हा एकदा कॅनडातील टोरंटोमध्ये हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आलं आह. टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रा उत्सवादरम्यान भाविकांवर अंडी फेकण्यात आली. कॅनडामध्ये संगना बजाज नावाच्या महिलेने इन्स्टाग्रामवर रथयात्रेदरम्यानचा व्हिडीओ काढला होता. यावेथी संगनाने रस्त्यावर पडलेली अंडी दाखवली. तिने सांगितले की ही अंडी इमारतीतून फेकली जात आहेत. भाविक रथयात्रेत रस्त्यावर भक्तिगीते गात जात असताना त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेच्या विरोधात रोष व्यक्त करत कॅनेडियन सरकारला आवश्यक ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
“टोरंटोमध्ये रथयात्रेच्या मिरवणुकीत उपद्रवी घटकांनी आणलेल्या व्यत्ययाबद्दलच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळाल्या आहेत. अशी घृणास्पद कृत्ये खेदजनक आहेत आणि एकता, समावेशकता आणि सामाजिक सौहार्द वाढविण्यासाठी असलेल्या उत्सवाच्या भावनेविरुद्ध आहेत. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी आम्ही कॅनेडियन अधिकाऱ्यांपुढे हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे. आम्हाला आशा आहे की कॅनेडियन सरकार लोकांच्या धार्मिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करेल," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
दरम्यान, या घटनेबद्दल नवीन पटनायक यांनीही या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. "कॅनडातील टोरंटो येथे रथयात्रेदरम्यान भाविकांवर अंडी फेकल्याच्या वृत्ताने मला खूप दुःख झाले आहे. अशा घटनांमुळे जगभरातील भगवान जगन्नाथाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या जात नाहीत तर ओडिशातील लोकांसाठीही दुःख झाले आहे ज्यांच्यासाठी या उत्सवाचे भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ओडिशा सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं आणि परराष्ट्र मंत्रालयाने कॅनेडियन अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित करावा," असं नवीन पटनायक यांनी म्हटलं.