इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:26 IST2025-12-01T17:25:38+5:302025-12-01T17:26:31+5:30
Imran Khan Pakistan Politics: इम्रान खान जिवंत असल्याचा एकही पुरावा दिला जात नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप

इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
Imran Khan Pakistan Politics: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू आहेत. या चर्चांमुळे कुटुंबालाही वेगळीच चिंता वाटत आहे. तशातच आता टी व्ही चॅनेल्सनाही त्यांचे नाव किंवा फोटो दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. इंटरनेटवर इम्रान खानची अलिकडची कुठलीही झलक दिसलेली नाही. या वातावरणात त्यांच्या मुलांनी पहिल्यांदाच उघडपणे बोलण्याचे धाडस केले आहे. पण पाकिस्तान सरकारने मात्र प्रक्षेपणबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
टीव्हीवर बंदी, इंटरनेटवरून चित्रे गायब
इम्रान खान यांचे डिजिटल सार्वजनिक अस्तित्व पूर्णपणे गायब झाल्याबद्दल कुटुंब घाबरले आहे. टीव्ही चॅनेल्सना त्यांचे नाव आणि फोटो प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक पाकिस्तानी चॅनेल्सना इम्रान खान यांचे नाव न घेण्याचे, त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ न चालवण्याचे किंवा त्यांचे कोणतेही विधान किंवा प्रतिक्रिया प्रसारित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लंडनमध्ये राहणारे इम्रानचे सुपुत्र कासिम खान म्हणतात की, त्यांनी त्यांच्या वडिलांना शेवटचे नोव्हेंबर २०२२ मध्ये पाहिले होते, जेव्हा इम्रान खानवर हल्ला झाला होता. कुटुंब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडूनही मदत मागत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना भेटण्याची सुविधा तात्काळ सुरू करावी. डॉक्टरांना आरोग्य तपासणी करण्याची परवानगी द्यावी आणि इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल अधिकृत अपडेट द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
माहिती न देणे हा मानसिक छळ
कासिम खान यांनी रॉयटर्सला सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या ठावठिकाणाची पुष्टी करणारा कोणताही पुरावा कुटुंबाला मिळालेला नाही. वडील सुरक्षित आहेत की जखमी आहेत की जिवंत आहेत हे माहित नसणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे, असा दावा त्यांनी केला आहे. कासिम यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने आठवड्यात एकदा भेट घेण्याचे आदेश दिले होते, परंतु तुरुंग प्रशासनाने सातत्याने टाळाटाळ केली आहे. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनाही एक वर्षापासून त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तुरुंग प्रशासनाने दावा केला आहे की इम्रान खान ठीक आहेत, परंतु हा दावा केवळ अज्ञात अधिकाऱ्यांवर आधारित आहे. कोणताही अधिकृत किंवा दृश्य पुरावा नाही.