रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:48 IST2025-10-24T08:48:02+5:302025-10-24T08:48:40+5:30
America vs Russia-Ukraine War: अमेरिकेच्या निर्बंधांना रशियाचा 'Act of War' चा इशारा! 'टॉमहॉक मिसाईल'चा उल्लेख होताच पुतिन संतापले

रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
मॉस्को/वॉशिंग्टन: युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन बलाढ्य तेल कंपन्यांवर नुकतेच नवे निर्बंध लादले. या कारवाईला रशियाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी थेट 'युद्धाची कृती' असे संबोधले आहे.
अमेरिकेने रशियाच्या लुकोइल आणि रोसनेफ्ट या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "रशियासारखा स्वाभिमानी देश कोणत्याही बाह्य दबावापुढे झुकणार नाही," असे ठणकावून सांगत पुतिन यांनी या निर्बंधांना 'अमैत्रीपूर्ण कृती' ठरवले आहे.
'टॉमहॉक' क्षेपणास्त्रावरून वाढला तणाव
रशियाचा हा कडक पवित्रा अशा वेळी आला आहे, जेव्हा युक्रेनकडून अमेरिकेकडे वारंवार टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांची (सुमारे १६०० किमी रेंज) मागणी होत आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की ही क्षेपणास्त्रे केवळ रशियन लष्करी तळांना लक्ष्य करतील. मात्र, रशियासाठी हे क्षेपणास्त्र युक्रेनला मिळणे 'रेड लाईन' ओलांडण्यासारखे आहे.
मेदवेदेव यांनी अमेरिकेवर टीका करताना स्पष्ट केले की, "ज्या कोणाला अजूनही काही गैरसमज असतील, त्यांनी हे समजून घ्यावे की अमेरिका आपला शत्रू आहे आणि त्यांचे शांततावादी म्हणवणारे लोक आता रशियाविरुद्ध पूर्णपणे युद्धाच्या मार्गावर आहेत."
या वाढत्या तणावामुळे अध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील बुडापेस्ट शिखर बैठक देखील रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुतिन यांनी ही बैठक रद्द झाली नसून केवळ 'स्थगित' झाल्याचे म्हटले आहे, पण सध्याचे वातावरण दोन्ही देशांमध्ये चर्चा नव्हे तर संघर्षाची शक्यता दर्शवत आहे.