जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 22:31 IST2025-10-25T22:24:46+5:302025-10-25T22:31:26+5:30
टीटीपी सीमेपलीकडून पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणच्या जमिनीचा वापर करत असल्याचे पाकिस्तानने म्हटलं.

जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
इस्लामाबाद - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी इस्तांबुलमध्ये शांतता चर्चेचा दुसरा टप्पा सुरू झाला. मात्र यातच पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानला डिवचणारे विधान केले आहे. जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल अशी उघड धमकी पाकिस्तानने अफगाणिस्तानला दिली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चर्चेचा पहिला टप्पा १८-१९ ऑक्टोबरला दोहा येथे संपन्न झाला. ज्यात तुर्की आणि कतारने मध्यस्थी केली. या चर्चेत अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व गृह उपमंत्री रहमतुल्लाह मुजीब यांनी केले. त्यात गृहमंत्री नूर अहमदचा भाऊ अनस हक्कानीही सहभागी होता तर पाकिस्तानकडून सुरक्षा अधिकाऱ्यांच्या २ सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, ज्यांनी पहिल्या टप्प्यातील चर्चेचे नेतृत्व केले होते. त्यांनी सियालकोट येथे रविवारपर्यंत चर्चेचा निष्कर्ष पुढे येऊ शकतो असा दावा केला.
जर अफगाणिस्तानसोबत चर्चा अयशस्वी झाली तर पाकिस्तानकडे अफगाणिस्तानसोबत उघडपणे संघर्षात उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकच्या डेली टाइम्सच्या मुलाखतीत सांगितले. मात्र दोन्ही देशांना शांतता हवी असं दिसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इस्लामाबाद एक थर्ड पार्टी ओवरसाइट स्ट्रक्चरही बनवू इच्छितात, ज्याचे सह अध्यक्षपद तुर्की किंवा कतार करू शकते. जेणेकरून आगामी काळात नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाऊ शकते. शांतता चर्चेत पाकिस्तानने अफगाणिस्तानला तहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेला रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी केली आहे. टीटीपी सीमेपलीकडून पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणच्या जमिनीचा वापर करत असल्याचे पाकिस्तानने म्हटलं.
दरम्यान, मागील काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेत. डूरंड लाइनवर दोन्ही देशात अनेकदा झटापट झाली. त्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे पाकिस्तानने या संघर्षामागे भारत असल्याचा आरोप केला. त्यातच पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षातून अफगाणिस्तानने भारताची नीती वापरत लवकरच कुनार नदीवर धरण बांधण्याची घोषणा केली. ज्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली. कुनार नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तानला मिळणारे पाणी कमी होईल. त्यातून तिथे पाणी संकट उभे राहण्याची भीती पाकिस्तानला आहे.