नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 08:32 IST2026-01-03T08:30:05+5:302026-01-03T08:32:43+5:30
काठमांडूवरून ५५ प्रवाशांना घेऊन उडालेले 'बुद्धा एअर'चे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून पुढे घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
नेपाळमधील भद्रपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री एक मोठी दुर्घटना होता-होता राहिली. काठमांडूवरून ५५ प्रवाशांना घेऊन उडालेले 'बुद्धा एअर'चे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून पुढे घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारक घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, वैमानिकाचे नियंत्रण आणि नशिबाची साथ यामुळे सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धा एअरचे 'फ्लाइट ९०१' हे विमान शुक्रवारी रात्री ८:२३ वाजता काठमांडूवरून भद्रपूरसाठी रवाना झाले होते. रात्री ९:०८ च्या सुमारास विमान भद्रपूर विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली. धावपट्टीवर टचडाऊन झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विमान वेगात पुढे सरकले आणि धावपट्टी सोडून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात जाऊन अडकले. अचानक लागलेल्या या धक्क्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
प्रवाशांचा जीव भांड्यात
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते रिंजी शेरपा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात ५५ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. विमान धावपट्टीवरून खाली उतरताच एअरपोर्ट अथॉरिटीने तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेत विमानाचे किरकोळ नुकसान झाले असून ते दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहे.
तांत्रिक पथकाकडून तपास सुरू
या घटनेनंतर झापाचे मुख्य जिल्हा अधिकारी शिवराम गेलल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुद्धा एअरने या प्रकरणाच्या चौकशीसाठी काठमांडूवरून एक विशेष तांत्रिक पथक भद्रपूरला पाठवले आहे. हे विमान या मार्गावरील त्या दिवसाचे शेवटचे उड्डाण होते आणि रात्रभर थांबून शनिवारी सकाळी पुन्हा काठमांडूला परतणार होते. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली की हवामानाचा काही परिणाम होता, याचा तपास आता ही टीम करणार आहे. विमानतळावर वेळीच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने मोठा अनर्थ टळला असून, सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.