गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 00:17 IST2025-10-12T00:16:36+5:302025-10-12T00:17:00+5:30
Israel Hamas War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने आकारास आलेल्या गाझा शांतता करारामुळे गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या गाझापट्टीत शांतता नांदेल, असे मानण्यात येत होते. मात्र पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासने इजिप्तमध्ये होणाऱ्या गाझा शांतता करारावर अधिकृतरीत्या स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.

गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने आकारास आलेल्या गाझा शांतता करारामुळे गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या गाझापट्टीत शांतता नांदेल, असे मानण्यात येत होते. मात्र पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासने इजिप्तमध्ये होणाऱ्या गाझा शांतता करारावर अधिकृतरीत्या स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणलेल्या या कराराच्या काही भागांवर आपले आक्षेप असल्याचे हमासने म्हटले आहे. त्यामुळे या शांतता कराराचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. तसेच गाझामध्ये शांतता प्रस्तापित व्हावी यासाठी हमासच्या सदस्यांनी गाझापट्टी सोडावी, या डोनाल्ड ट्रम्र यांनी दिलेल्या सल्ल्याची हमासच्या सदस्यांनी खिल्ली उडवली आहे.
याबाबत राजकीय ब्युरोचे सदस्य होसम बदरान यांनी प्रसारमाध्यमांना सांगिते की, पॅलेस्टाइनींना मग ते हमासचे सदस्य असोत वा नसोत त्यांच्या भूमीवरून बाहेर काढण्याची सूचना ही पूर्णपणे मुर्खपणाची आहे. तसेच बरीशी गुंतागुंत असल्याने या शांतता प्रस्तावातील दुसऱ्या टप्प्याबाबच चर्चा करणं कठीण होईल.
गाझा शांतता कराराबाबत हमासने ही टिप्पणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्य पूर्वेतील दौऱ्यापूर्वी केली आहे. तसेच हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शांतता करारामध्ये अनेक राजकीय अडथळे आहेत. तसेच हमासने शस्त्रे खाली ठेवावीत, अशीही यात एक अट आहे. हमास गाझा सरकारमधून बाजूला होईल, पण शस्त्र खाली ठेवणं शक्य नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.