हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 08:50 IST2025-11-26T08:47:47+5:302025-11-26T08:50:09+5:30
महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे हे भुयार राफा शहराच्या अतिशय दाट लोकवस्तीखाली आहे. या भुयाराच्या वर अतिशय महत्त्वाच्या संस्था आणि त्यांची कार्यालयं आहेत.

हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
गाझामध्ये ‘युद्धविराम’ झाला असला तरी तेथील संघर्ष मात्र अद्याप संपलेला नाही. इस्रायलचे गाझावरील हल्ले अजूनही सुरूच आहेत. लोक मृत्युमुखी पडत आहेत. इस्रायलचं म्हणणं आहे, हमासचे अतिरेकी अजूनही शांत बसलेले नाहीत. जमिनीखालच्या भुयारांचा ते अजूनही विस्तार करीत आहेत आणि आजही अशी अनेक भुयारं गाझामध्ये आहेत, ज्यांचा ते उपयोग करीत आहेत.
इस्रायलनं नुकताच दावा केला आहे की त्यांच्या सैन्यानं गाझाच्या राफा परिसरात हमासनं तयार केलेलं एक अतिशय मोठं आणि जटिल भूमिगत बोगद्यांचं नेटवर्क शोधून काढलं आहे. त्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. या भुयाराचा विस्तार पाहून केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं आहे. कारण हमासनं जमिनीखाली चक्क जवळपास एक गावच वसवलं होतं. गाझामध्ये जमिनीखाली २५ मीटर खोल हे भुयार असून, त्यात ८० खोल्या आहेत. त्यात शौचालयासह इतर साऱ्याच सोयी आहेत. तब्बल सात किलोमीटर लांबीच्या या भुयाराचा उपयोग शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी, हमासच्या अतिरेक्यांना लपण्यासाठी केला जात होता. या खोल्यांमध्ये शस्त्रास्त्र ठेवण्यासाठीही स्वतंत्र जागा आहे. सहजपणे ती लक्षात येणार नाही अशा रीतीनं त्याची रचना करण्यात आली आहे.
महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे हे भुयार राफा शहराच्या अतिशय दाट लोकवस्तीखाली आहे. या भुयाराच्या वर अतिशय महत्त्वाच्या संस्था आणि त्यांची कार्यालयं आहेत. त्यात संयुक्त राष्ट्रांची इमारत, मशीद, शरणार्थी छावणी, रुग्णालय आणि शाळा आहेत. या भुयाराचा वापर हमासचे कमांडर शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी, बैठकांसाठी आणि राहण्यासाठी करत होते. इस्रायली डिफेन्स फोर्सेसचं (आयडीएफ) म्हणणं आहे की याच भुयारात इस्रायली सैन्याचे लेफ्टनंट हदार गोल्डिन यांचं शव ठेवलं गेलं होतं. गोल्डिन २०१४ च्या इस्रायल-हमास युद्धात मारले गेले होते. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार हमासनं याच महिन्यात गोल्डिन यांचं शव इस्रायलला परत दिलं होतं.
गाझामध्ये अजून अनेक भुयारं असतील याची इस्रायलला खात्री होती. त्यामुळे कधीपासूनच त्यांचा यासंदर्भात शोध सुरू होता. हे भुयार शोधण्याचं काम एलीट याहलोम कॉम्बॅट इंजिनिअरिंग युनिट आणि शायेत १३ नेव्हल कमांडोंनी केलं आहे. ७ ऑक्टोबर २०२३ला हमासनं इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात इस्रायलचे १२०० नागरिक मारले गेले होते. त्यानंतर या युद्धाला तोंड फुटलं. अलीकडेच अमेरिकेच्या मध्यस्थीनं दोन्ही पक्षांमध्ये युद्धविराम झाला, पण दोन्ही बाजूंकडून धुसफूस अजूनही सुरूच आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू होण्यापूर्वीपासूनच इस्रायलनं अनेक वेळा दावा केला आहे की हमासनं गाझामध्ये मोठं भुयारी नेटवर्क उभारलं आहे आणि युद्धादरम्यान त्यांच्या लढवय्यांकडून त्याचा वापर केला जातो.
गाझा पट्टीत आता नव्यानं संघर्ष सुरू झाला आहे. इस्रायलनं नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यात पुन्हा ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युद्धबंदीचं उल्लंघन झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे ७०,००० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासची सगळी भुयारं, बंकर्स आणि अतिरेकी उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं इस्रायलचं म्हणणं आहे.