पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:59 IST2025-12-24T09:58:38+5:302025-12-24T09:59:20+5:30

पॅलेस्टिनी समर्थकांच्या आंदोलनात सहभाग घेणे ग्रेटाला महागात पडले आहे. प्रतिबंधित संघटनेला पाठिंबा दर्शवल्याच्या आरोपाखाली लंडन पोलिसांनी ही कारवाई केली.

Greta Thunberg took to the streets for Palestinian supporters and was handcuffed by the police; High-voltage drama in London! | पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

आपल्या परखड मतांसाठी जगभरात ओळखली जाणारी स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ मध्य लंडनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. लंडनमध्ये सध्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या समर्थनार्थ 'हंगर स्ट्राईक' म्हणजेच उपोषण सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी २२ वर्षीय ग्रेटा तेथे पोहोचली होती.

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, 'प्रिझनर फॉर पॅलेस्टाईन' या गटाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ग्रेटा थनबर्ग एका प्रतिबंधित संघटनेच्या समर्थनार्थ फलक हातात धरून उभी असलेली दिसत आहे. ब्रिटीश सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला 'पॅलेस्टाईन ॲक्शन' या संघटनेवर दहशतवादी गट म्हणून बंदी घातली आहे. याच संघटनेच्या सदस्यांना पाठिंबा दर्शवणे ग्रेटाला महागात पडले असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

विमा कंपनीवर फेकला लाल रंग 

हे आंदोलन एका मोठ्या मोहिमेचा भाग होते. यादरम्यान लंडनच्या आर्थिक केंद्रात दोन कार्यकर्त्यांनी एका मोठ्या विमा कंपनीच्या कार्यालयावर लाल रंग फेकला. इस्रायली संरक्षण कंपनी 'एल्बिट सिस्टम्स'ला ही विमा कंपनी मदत करते, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. या तोडफोडीच्या आणि मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली एका पुरुष आणि एका महिलेला आधीच अटक करण्यात आली होती, त्यानंतर ग्रेटा थनबर्गवरही कारवाई करण्यात आली. मात्र, तिला काही तासांनंतर सोडून देण्यात आले. 

उपोषण आणि ग्रेटाचा पाठिंबा 

सध्या ब्रिटनमधील विविध तुरुंगांत 'पॅलेस्टाईन ॲक्शन'चे आठ सदस्य बंदिस्त आहेत. त्यांच्यावर आधीच्या आंदोलनांशी संबंधित विविध गुन्हे दाखल असून, त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ या सदस्यांनी तुरुंगातच उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ग्रेटाने पाठिंबा दिल्याने या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे.

पोलिसांची भूमिका काय?

लंडन पोलिसांनी सांगितले की, गुन्हेगारी स्वरूपाचे नुकसान करणे आणि प्रतिबंधित संघटनेला पाठिंबा देणे या संशयावरून एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ब्रिटनमधील नियमांनुसार, आरोप निश्चित होईपर्यंत संशयितांची नावे अधिकृतपणे उघड केली जात नाहीत, मात्र सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीमुळे ग्रेटाची अटक सगळ्यांसामोर आली. 

Web Title: Greta Thunberg took to the streets for Palestinian supporters and was handcuffed by the police; High-voltage drama in London!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.