भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 09:28 IST2025-07-07T09:27:57+5:302025-07-07T09:28:37+5:30

golden visa uae : यूएईने भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे.

Good news for Indians! UAE launches special visa; What is the entire process? Know | भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

Golden Visa UAE Process :  संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यूएईने भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. या नव्या योजनेत गुंतवणुकीची किंवा व्यवसायाची गरज नाही, फक्त नामांकनावर आधारित प्रणालीद्वारे हा व्हिसा मिळू शकतो.

याआधी गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी दुबईमध्ये एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणं किंवा सुमारे ४.६६ कोटी रुपये (२० लाख दिराम) किमतीची मालमत्ता खरेदी करणं आवश्यक होतं. पण आता नवीन योजनेत फक्त १ लाख दिराम (२३.३० लाख रुपये) शुल्क भरून गोल्डन व्हिसासाठी अर्ज करता येईल.

सध्या चाचणी म्हणून सुरुवात!
ही योजना सध्या चाचणी पातळीवर भारत आणि बांगलादेशात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांत ५ हजारांपेक्षा अधिक भारतीय अर्ज करणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रियेची जबाबदारी ‘रयाद ग्रुप’ नावाच्या कन्सल्टन्सी कंपनीकडे दिली गेली आहे.

रयाद ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रयाद कमाल अयूब यांनी ही योजना भारतीयांसाठी एक ‘गोल्डन संधी’ असल्याचं म्हटलं आहे. यानंतर ही योजना CEPA (Comprehensive Economic Partnership Agreement) देशांमध्येही राबवली जाईल.

 कशी असेल अर्जाची प्रक्रिया?
या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्याची पार्श्वभूमी तपासली जाईल, ज्यात मनी लॉन्ड्रिंग आणि गुन्हेगारी इतिहासाची तपासणी असेल. याशिवाय अर्जदाराच्या सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जाईल. हा व्हिसा देताना अर्जदार यूएईच्या उद्योग, संस्कृती, विज्ञान, स्टार्टअप, व्यवसाय, किंवा इतर क्षेत्रांना कसा फायदा होईल, हेही पाहिलं जाईल. चाचणी पूर्ण झाल्यावर रयाद ग्रुप सरकारकडे शिफारस करेल, आणि सरकार अंतिम निर्णय घेईल.

कुठे करता येईल अर्ज?
> भारत आणि बांगलादेशातील वन वास्को सेंटर

> रयाद ग्रुपचे नोंदणीकृत कार्यालय

> ऑनलाइन पोर्टल

> किंवा कॉल सेंटर यांच्यामार्फत अर्ज करता येईल.

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला दुबईला प्रत्यक्ष जावं लागेल.

योजनेचे फायदे काय?
या नव्या व्हिसाची खासियत म्हणजे तो संपत्तीवर आधारित नसल्यामुळे मालमत्ता विकली किंवा विभागली गेली, तरी व्हिसा रद्द होणार नाही. एकदा मिळालेला नामांकनाधारित व्हिसा कायमस्वरूपी असतो. याशिवाय, लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत आणता येईल, घरगडी किंवा ड्रायव्हर ठेवता येतील, आणि ते स्वतः व्यवसाय किंवा व्यावसायिक कामही करू शकतील. ही योजना भारतातून यूएईमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या अनेक लोकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते.

Web Title: Good news for Indians! UAE launches special visa; What is the entire process? Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.