२०२६ च्या ऑस्करसाठी ‘कांतारा : चॅप्टर १’, ‘तन्वी द ग्रेट’सह चार भारतीय चित्रपट पात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:09 IST2026-01-10T10:09:48+5:302026-01-10T10:09:48+5:30
ॲकॅडमीने ९८ व्या ऑस्करसाठीची ‘रिमाइंडर लिस्ट’ प्रसिद्ध केली.

२०२६ च्या ऑस्करसाठी ‘कांतारा : चॅप्टर १’, ‘तन्वी द ग्रेट’सह चार भारतीय चित्रपट पात्र
लॉस एंजेलिस : कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा : अ लिजेंड - चॅप्टर १’ आणि हिंदी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ यांसह चार भारतीय चित्रपट २०२६ च्या ऑस्कर मधील ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ श्रेणीत स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ‘ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने घोषित केलेल्या २०१ पात्र चित्रपटांच्या यादीत हे चित्रपट आहेत.
ॲकॅडमीने गुरुवारी ९८ व्या ऑस्करसाठीची ‘रिमाइंडर लिस्ट’ प्रसिद्ध केली. २२ जानेवारी रोजी अधिकृत नामांकने जाहीर होणार आहेत. यात सर्वसाधारण श्रेणी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निकष पूर्ण करणाऱ्या चित्रपटांचा समावेश असतो.
पात्र ठरलेले भारतीय चित्रपट
‘कांतारा’, ‘तन्वी द ग्रेट’, महावतार नरसिंहा (बहुभाषिक ॲनिमेटेड चित्रपट), टूरिस्ट फॅमिली (तमिळ चित्रपट), ‘सिस्टर मिडनाइट’ (हिंदी चित्रपट)
‘होमबाउंड’ला टक्कर मिळेल?
ॲकॅडमीने ‘इंटरनॅशनल फिचर फिल्म’सह १२ श्रेणींसाठी आपली ‘शॉर्टलिस्ट’ जाहीर केली होती. भारताची अधिकृत एन्ट्री असलेल्या नीरज घायवान यांच्या ‘होमबाउंड’ या चित्रपटाने १५ चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. हा सोहळा १५ मार्च रोजी आहे.
ऑस्करचे निवडीचे निकष आणि प्रक्रिया
९८ व्या ऑस्करसाठी एकूण ३१७ चित्रपट पात्र आहेत, त्यापैकी २०१ चित्रपटांनी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ श्रेणीसाठीचे निकष पूर्ण केले आहेत.
या यादीत नाव असणे म्हणजे नामांकन मिळणे नव्हे; अंतिम नामांकनासाठी या चित्रपटांना ॲकॅडमीच्या मतदान प्रक्रियेतून जावे लागेल.
पात्रतेसाठी, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान अमेरिकेतील प्रमुख सहा शहरांपैकी किमान एका शहरात चित्रपट प्रदर्शित होणे आणि सलग सात दिवस चालणे अनिवार्य आहे.