अफगाणिस्तान सोडण्यासाठी मुलींचे बळजबरीने लग्न, रिपोर्टमध्ये खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:16 IST2021-09-03T18:16:17+5:302021-09-03T18:16:28+5:30
Afghanistan Crisis: देश सोडण्यासाठी महिलांना सर्वात जास्त अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

अफगाणिस्तान सोडण्यासाठी मुलींचे बळजबरीने लग्न, रिपोर्टमध्ये खुलासा
काबुल:अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा केल्यानंतर शेकडो-हजारो अफगाणी नागरिक जीव मुठीत घेऊन देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नात अनेकांना यश आलंय, तर काहींना अपयश. या दरम्यान काही जणांचा मृत्यूही झालाय. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही प्रचंड व्हायरल होताहेत. यात सर्वात जास्त अडचण येतीय अफगाणिस्तानातील तरुणींना. एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील अनेक तरुणांना देश सोडून जाण्यासाठी बळजबरीने लग्न करावं लागत आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानच्या आधीच्या शासनाचा अनुभव असल्यामुळे आता परत त्यांना तालिबानी शासनात राहण्याची इच्छा नाही. यासाठी मिळेल त्या विमानाने अफगाणिस्तान सोडून कुठल्याही देशात जाण्यासाठी विमानतळावर प्रचंड गर्दी होत आहे. यात देश सोडताना महिलांना सर्वात जास्त अडचणींना सामोरे जावं लागत आहे.
एका रिपोर्टनुसार, काबुल विमानतळावर देश सोडण्यासाठी मुलींचे जबरदस्तीने लग्न लावले जात आहे. तसेच, काही महिला परपुरुषांना त्यांचे पती असल्याचे सांगत विमानात प्रवेश मिळवत आहेत. या घटना प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून यूएईला गेलेल्या आणि तेथून अमेरिकेला जाणाऱ्या महिलांसोबत घडत आहेत. याशिवाय काही पालक आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरुषांना पैसे देऊन आपल्या मुलींचे लग्न त्यांच्यासोबत लावून देत आहेत. अमेरिकाचा परराष्ट्र विभाग या प्रकरणी संयुक्त अरब अमिरातीमधील आपल्या अधिकार्यांची मदत घेऊन अमेरिकेत पोहोचलेल्या अशा काही महिलांचा शोध घेत आहेत.