रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:52 IST2025-12-06T13:51:43+5:302025-12-06T13:52:07+5:30
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.

रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सीमेवर रात्रीभर जोरदार गोळीबार झाला. या घटनेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धविरामावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही बाजूचे सैन्य एकमेकांवर युद्धविराम मोडल्याचा आरोप करत आहेत. पाकिस्तान-अफगाण सीमेवरील चमन आणि स्पिन बोलदक या भागांमध्ये हा गोळीबार झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे समोर आले नाही.
पाकिस्तानी पोलीस अधिकारी मोहम्मद सादिक यांनी असा दावा केला आहे की, गोळीबाराची सुरुवात अफगाणिस्तानच्या बाजूने झाली, त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी त्याला प्रत्युत्तर दिले. याउलट, काबूलमध्ये तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानवर आरोप केला आहे की, पहिला हल्ला पाकिस्तानी सैन्याने केला आणि अफगाण सैन्याला प्रत्युत्तर देणे भाग पडले.
युद्धबंदी पाळणार कोण?
अफगाण सीमा पोलिसांचे प्रवक्ते अबिदुल्लाह फारूकी यांनी सीएनएनला माहिती दिली की, पाकिस्तानी सैन्याने सर्वप्रथम हँड ग्रेनेड फेकला, ज्यामुळे अफगाण सैनिकांना प्रत्युत्तरादाखल कारवाई करावीच लागली. अफगाणिस्तान अजूनही युद्धबंदीचे पालन करण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, पाकिस्तानने दावा केला की, अफगाण तालिबान सैन्याने कोणतेही कारण नसताना गोळीबार सुरू केला. तर, पाकिस्तानी सैन्य पूर्ण सतर्कतेने देशाची सुरक्षेची काळजी घेत आहे.
शांतता चर्चेला धक्का, वाढतोय अविश्वास!
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार संघर्षात दोन्ही बाजूंनी डझनावर सैनिक आणि नागरिक मारले गेले होते. त्यानंतर कतारच्या मध्यस्थीने ऑक्टोबरमध्ये एक संघर्षविराम लागू झाला होता, ज्यामुळे परिस्थिती काहीशी शांत झाली होती. मात्र, त्यानंतर इस्तंबूलमध्ये झालेल्या शांतता चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, त्यामुळे सीमेवरचा तणाव सतत कायम आहे.
पाकिस्तानची मुख्य चिंता काय?
पाकिस्तान आपल्या देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी 'तालिबान पाकिस्तान' या संघटनेला जबाबदार धरतो. हा गट अफगाण तालिबानपेक्षा वेगळा असला तरी त्यांचे एकमेकांशी सख्य आहे. २०२१मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर, मोठ्या संख्येने टीटीपी दहशतवादी अफगाणिस्तानात आश्रयाला गेले असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. यामुळे पाकिस्तानच्या सीमा सुरक्षेची आव्हाने अधिक वाढली असून, दोन्ही देशांमधील अविश्वास वाढत चालला आहे.