इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 08:57 IST2025-07-15T08:57:44+5:302025-07-15T08:57:59+5:30
Iran-Israel : इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या जरी युद्धविराम असला, तरी दोन्ही देशांमधील संघर्ष थांबलेला नाही.

इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या जरी युद्धविराम असला, तरी दोन्ही देशांमधील संघर्ष थांबलेला नाही. आजही ते एकमेकांविरोधात गुप्तपणे आणि मानसिक पातळीवर युद्ध लढत आहेत. अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे युद्ध संपलेलं नसून, एका मोठ्या युद्धाच्या तयारीसाठी थांबलं आहे. इराणच्या संरक्षणमंत्र्यांच्या ताज्या विधानाने या अंदाजाला दुजोरा मिळाला आहे.
इराणला युद्धविरामावर विश्वास नाही: नव्या युद्धाची शक्यता!
इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, इस्रायलसोबतच्या सध्याच्या युद्धविरामावर इस्लामिक गणराज्याचा विश्वास नाही. त्यांनी नव्या युद्धाच्या शक्यतेवर आधारित अनेक लष्करी योजना तयार केल्या असल्याचंही म्हटलं आहे. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अजीज नसीरजादेह यांनी सोमवारी तुर्कीचे संरक्षणमंत्री यासर गुलर यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “इराणला युद्धविरामावर विश्वास नाही. म्हणूनच, आम्ही कोणत्याही नव्या हल्ल्याच्या शक्यतेसाठी अनेक परिस्थितींचा विचार केला आहे.”
“आम्ही चर्चेच्या विरोधात नाही, पण हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ”
नसीरजादेह यांनी तुर्कीच्या समकक्षांना सांगितलं की, इराणला या क्षेत्रात युद्ध आणि अशांतता वाढवायची नाही. परंतु, कोणत्याही आक्रमक कारवाईला सडेतोड उत्तर देण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत, ज्यामुळे शत्रूला पश्चात्ताप होईल. त्यांनी इस्रायली हल्ल्यांच्या वेळेवरही टीका केली. ते म्हणाले, “इराणवरील हल्ला चर्चेदरम्यान झाला. आम्ही जगाला हे सिद्ध केलं आहे की, आम्ही चर्चा आणि कराराच्या विरोधात नाही.”
१२ दिवसांचा रक्तरंजित संघर्ष
१३ जून रोजी इस्रायलने अचानक इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. १२ दिवस चाललेल्या या संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इराणच्या अनेक अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी नागरिक मारले गेले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनेही हल्ले केले, ज्यात २७ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक इमारती तसेच लष्करी अड्ड्यांचं नुकसान झालं. इस्रायली हल्ल्यानंतर १५ जून रोजी मस्कतमध्ये होणारी इराण-अमेरिका अणु चर्चा रद्द करण्यात आली होती.