बाप से बेटा सवाई, पण इथे लेक भारी! किम जोंग उन यांच्या वारसदाराची गोष्ट; १३ व्या वर्षीच हाती येणार सत्ता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:00 IST2026-02-13T18:06:04+5:302026-02-13T19:00:09+5:30
हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपली १३ वर्षांची मुलगी किम जू ए हिला आपला वारसदार म्हणून घोषित करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

बाप से बेटा सवाई, पण इथे लेक भारी! किम जोंग उन यांच्या वारसदाराची गोष्ट; १३ व्या वर्षीच हाती येणार सत्ता!
जगासाठी गूढ आणि दहशतीचा केंद्रबिंदू असलेल्या उत्तर कोरियामध्ये आता सत्तेच्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपली १३ वर्षांची मुलगी किम जू ए हिला आपला वारसदार म्हणून घोषित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, ज्या देशात महिलांच्या अधिकारांवर अनेक निर्बंध आहेत, तिथे किम जोंग उन आपल्या मुलाला डावलून मुलीला का प्राधान्य देत आहेत, याच्या चर्चेने जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे.
शाळेची पायरीही चढली नाही, पण ट्रेनिंग कडक!
उत्तर कोरियाच्या 'इन्साइडर' अहवालानुसार, किम जोंग उन यांच्या कुटुंबात पारंपारिक शालेय शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही. किम जोंग उन स्वतः देखील फारसे शिकलेले नाहीत, त्यांनी लष्करी महाविद्यालयातून शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी किम जू ए हिला देखील शाळेत पाठवले जात नाही. उत्तर कोरियातील शाळेत मुलींना केस कानाखाली येतील इतके कापण्याचे कडक नियम आहेत, मात्र किम जू ए नेहमी मोठ्या केसांमध्ये आणि स्टायलिश कपड्यांमध्ये दिसते, ज्यावरून ती शाळेत जात नसल्याचे स्पष्ट होते. तिचे प्राथमिक शिक्षण तिच्या आईच्या देखरेखीखालीच झाले आहे.
घोडेस्वारी आणि स्कीइंगचा छंद
किम कुटुंबात घोडेस्वारीला सत्तेचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. किम जोंग उन स्वतः उत्तम घोडेस्वार आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीलाही यात पारंगत केले आहे. किम जू ए हिला घोडेस्वारी आणि स्कीइंगचा प्रचंड छंद आहे. किम जोंग उन तिला प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात, अगदी क्षेपणास्त्र चाचणीच्या ठिकाणीही सोबत घेऊन जातात. यामागे तिला मुत्सद्देगिरी आणि राजशिष्टाचार शिकवण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे.
मुलाला का नाकारले? समोर आले धक्कादायक कारण
किम जोंग उन यांना तीन अपत्ये असल्याचे बोलले जाते. मग मोठा मुलगा असताना मुलीचीच निवड का? दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर संस्थेच्या दाव्यानुसार, किम यांचा मोठा मुलगा शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आहे आणि त्याला काही अज्ञात व्याधी असल्याचे समजते. त्यामुळे सामर्थ्य दाखवण्याची परंपरा असलेल्या किम कुटुंबाला तो मुलगा वारसदार म्हणून योग्य वाटत नाही. म्हणूनच किम जोंग उन यांनी आपली लाडकी मुलगी किम जू ए हिला जगासमोर आणले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पार्टीच्या जनरल मीटिंगमध्ये किम जोंग उन आपल्या मुलीच्या नावाचा वारसदार म्हणून अधिकृत जाहीरनामा काढण्याची शक्यता आहे.