"जोहरान ममदानी भारतीय लोकांचा द्वेष करतात"; न्यूयॉर्कच्या नवीन महापौरांवर ट्रम्प यांच्या मुलाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 09:25 IST2025-11-19T09:24:07+5:302025-11-19T09:25:38+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प यांनी नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"जोहरान ममदानी भारतीय लोकांचा द्वेष करतात"; न्यूयॉर्कच्या नवीन महापौरांवर ट्रम्प यांच्या मुलाचा गंभीर आरोप
Eric Trump on Zohrab Mamdani: न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार झोहरान ममदानी यांनी दणदणीत विजय मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधानंतरही जोहरान ममदानी यांनी विजय खेचून आणला. मात्र निवडणुकीनंतरही जोहरान ममदानी हे ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. आता ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्पने जोहरान ममदानीवर निशाणा साधला आहे. एरिक ट्रम्प यांनी नुकत्याच एका मुलाखतीत नवनिर्वाचित महापौर ममदानी यांच्यावर जोरदार टीका करताना धक्कादायक आरोप केला की ममदानी भारतीय समुदायाचा द्वेष करतात आणि समाजवादी कम्युनिस्ट अजेंडा राबवतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र विरोधानंतरही ममदानी यांनी मोठा विजय मिळवून इतिहास रचला आहे. ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे १०० हून अधिक वर्षांतील सर्वात तरुण, पहिले मुस्लिम, पहिले दक्षिण आशियाई वंशाचे आणि आफ्रिकेत जन्मलेले महापौर बनणार आहेत. एरिक ट्रम्प यांनी जोहरान ममदानी हे कम्युनिस्ट अजेंड्याचा चेहरा असल्याचे म्हटले. एरिक यांचा दावा आहे की ममदानींची ही समाजवादी विचारसरणी प्रमुख अमेरिकन शहरांना उद्ध्वस्त करत आहे आणि मोठ्या कंपन्यांना समाजवादी धोरणांमुळे संघर्ष करण्यास भाग पाडत आहे.
एरिक ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहराबद्दल खंत व्यक्त केली. "जे शहर एकेकाळी जगातील महान शहर होते, ते आता वाईट राजकारणामुळे आपले महत्त्व गमावत आहे. त्यांनी ममदानी किराणा दुकानांचे राष्ट्रीयीकरण करू इच्छितात आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना अटक करण्याची इच्छा व्यक्त करतात, असेही त्यांनी म्हटले.
'ते भारतीय आणि ज्यू लोकसंख्येचा द्वेष करतात'
एरिक ट्रम्प यांनी ममदानींवर सर्वात मोठा आरोप करताना म्हटले की, "जोहरान ममदानी ज्यू आणि भारतीय लोकांचा द्वेष करतात. ममदानींचे लक्ष मूलभूत समस्यांवरून हटले आहे आणि त्यांनी सुरक्षित रस्ते, शहराची स्वच्छता आणि योग्य कर प्रणाली राखण्यासारख्या मूलभूत प्रशासकीय कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सरकारी हस्तक्षेपाशिवायच शहर यशस्वी होऊ शकते."
जोहरान ममदानींचा भारताशी संबंध
जानेवारी रोजी महापौरपदाची सूत्रे हाती घेणारे जोहरान ममदानी हे युगांडातील कंपाला येथे १८ ऑक्टोबर १९९१ रोजी जन्मले. ते प्रसिद्ध विद्वान महमूद ममदानी आणि प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचे पुत्र आहेत. सात वर्षांचे असताना ते न्यूयॉर्कला आले. ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्स आणि बोव्डोइन कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. २०२० मध्ये ते न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे आमदार म्हणून निवडून आले. ममदानी यांनी परवडणारी घरे, सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि सामाजिक न्यायावर जोर देत निवडणूक लढवली आणि ते आता प्रगतीशील नेते म्हणून अमेरिकेच्या राजकारणात उदयास आले आहेत.