अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:52 IST2025-12-24T10:52:10+5:302025-12-24T10:52:38+5:30
खळबळजनक खुलासा: ३० हजार पानांच्या 'एपस्टीन फाइल्स'मधून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अमेरिकेच्या 'जस्टिस डिपार्टमेंट'ने कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित सुमारे ३० हजार पानांची नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्यावर बलात्कारासारखे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या खासगी प्रवासाबाबतही अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
नेमके काय आहेत आरोप?
जस्टिस डिपार्टमेंटने जारी केलेल्या 'एफबीआय' फाइल्समध्ये एका महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या महिलेने असा दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे, एका लिमोझिन ड्रायव्हरने १९९५ मध्ये ट्रम्प यांचा एक फोन कॉल ऐकला होता, ज्यामध्ये ते एका मुलीशी गैरवर्तन करण्याबाबत बोलत होते, असाही उल्लेख या कागदपत्रांत आहे. मात्र, अमेरिकन तपास यंत्रणांनी हे स्पष्ट केले आहे की, हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत आणि यासाठी ठोस पुराव्यांची कमतरता आहे.
खासगी विमानातील प्रवासाचे गुपित उघड
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी जाहीरपणे सांगितले होते की, त्यांनी कधीही एपस्टीनच्या विमानातून प्रवास केला नाही. मात्र, नवीन 'फ्लाईट लॉग्स'नी हा दावा फोल ठरवला आहे. १९९३ ते १९९६ दरम्यान ट्रम्प यांनी किमान आठ वेळा एपस्टीनच्या प्रायव्हेट जेटने प्रवास केल्याचे रेकॉर्ड्सवरून समोर आले आहे. काही प्रवासांमध्ये त्यांची तत्कालीन पत्नी मार्ला मॅपल्स आणि त्यांची मुलेही सोबत होती.
रहस्यमयी महिला आणि गिस्लीन मॅक्सवेल
कागदपत्रांनुसार, यातील काही प्रवासांत एपस्टीनची जवळची सहकारी गिस्लीन मॅक्सवेल (जिला नंतर सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले) ही देखील उपस्थित होती. १९९३ मधील एका विमानात तर फक्त एपस्टीन, ट्रम्प आणि एक २० वर्षीय अनोळखी महिलाच होती, जिची ओळख अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे.
खळबळजनक ट्विस्ट आणि संशयास्पद मृत्यू
या प्रकरणात एक थरारक वळणही समोर आले आहे. ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा नंतर संशयास्पद परिस्थितीत गोळी लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या आरोपांच्या चौकशीत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. याशिवाय, फाइल्समध्ये एपस्टीनने हाताने लिहिलेले एक पत्रही सापडले असून, त्यात ट्रम्प यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. मात्र, या पत्राची सत्यता अद्याप पटलेली नाही.
ट्रम्प यांच्यासाठी किती धोकादायक?
जस्टिस डिपार्टमेंटने स्पष्ट केले आहे की, हे दस्तऐवज २०२० च्या निवडणुकीपूर्वी गोळा करण्यात आले होते आणि ट्रम्प यांच्यावर सध्या कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. तरीही, या नव्या खुलाशांमुळे ट्रम्प यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.