"बस जळून खाक झाली, पण ड्रायव्हर वाचला"; सौदीतल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला सांगितला थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:34 IST2025-11-17T14:34:36+5:302025-11-17T14:34:58+5:30
सौदीत झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला.

"बस जळून खाक झाली, पण ड्रायव्हर वाचला"; सौदीतल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला सांगितला थरारक अनुभव
Saudi Arabia Bus Accident: सौदी अरेबियात एक भीषण रस्ता अपघात झाला असून ज्यामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या अनेक भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसची डिझेल टँकरशी टक्कर झाली, ज्यामुळे बसला आग लागली. सौदी अरेबियाच्या मुफ्रीहाट भागात हा अपघात झाला. मृतांपैकी अनेक जण तेलंगणाचे होते. या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली मात्र बसचा संपूर्ण कोळसा झाला होता. या अपघातात फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मक्का येथून मदिनाकडे उमराह यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. सौदी अरेबियामध्ये रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका डिझेल टँकरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसने क्षणात पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण बस जळून खाक झाली. या अत्यंत भयंकर अपघातात बसमधील तब्बल ४२ भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बसचा चालक मोहम्मद अब्दुल शोएब हा मात्र चमत्कारिकरित्या बचावला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हैदराबादच्या यात्रेकरूंचा मोठा सहभाग
या अपघातातील बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश यात्रेकरू हे भारतीय होते. यापैकी बहुतांश यात्रेकरू हे हैदराबाद येथील 'अल-मिना हज आणि उमराह ट्रॅव्हल्स' या एजन्सीमार्फत प्रवास करत होते आणि किमान १६ प्रवासी एकट्या हैदराबाद शहरातून होते. अपघाताच्या ठिकाणाहून एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा हैदराबादचा नागरिक असलेला प्रत्यक्षदर्शी फोनवर बोलताना सांगत आहे. "मक्काहून मदिनाकडे येणारी ती बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्या बसमधून केवळ चालक आणि एक व्यक्ती वाचली आहे. बसमध्ये हैदराबादचे अनेक लोक होते," असं तो व्हिडीओमध्ये म्हणत आहे. त्याने लोकांना त्यांच्या नातेवाइकांचा ठावठिकाणा शोधण्याचे आवाहन केले आहे.
भारताकडून तातडीने मदतकार्य
या भीषण दुर्घटनेनंतर भारत सरकारने आणि परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पाऊले उचलली आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रियाध आणि जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिकारी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करत आहेत. तेलंगणा सरकारने दिल्लीतील तेलंगणा भवन येथे तात्काळ एक नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. तसेच, जेद्दाह येथील भारतीय दूतावासाने मदतीसाठी २४x७ हेल्पलाइन क्रमांक ८००२४४०००३ जारी केला आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.