महापूराची भविष्यवाणी करणारा, स्वतःला देवाचा अवतार सांगणारा एबोह नोहा अखेर पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:03 IST2026-01-01T19:02:31+5:302026-01-01T19:03:12+5:30
Eboh Noah Arrested: ख्रिसमसच्या दिवशी महापूर आणि प्रचंड पावसाची भविष्यवाणी केल्याने एबो नोआ चर्चेत आला होता.

महापूराची भविष्यवाणी करणारा, स्वतःला देवाचा अवतार सांगणारा एबोह नोहा अखेर पोलिसांच्या ताब्यात
Eboh Noah Arrested: स्वतःला देवाचा अवतार असल्याचा दावा करत ख्रिसमसच्या दिवशी महापूर आणि प्रचंड पावसाची भविष्यवाणी करणाऱ्या एबो नोआ(Eboh Noah) याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हातात बेड्या घातलेला त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे.
महापूराची भविष्यवाणी करणारा ‘स्वयंघोषित अवतार’ अटकेत
मीडिया रिपोर्टनुसार, स्वतःला ‘आधुनिक काळातील नोआ’ म्हणवणाऱ्या या व्यक्तीचे खरे नाव इव्हान्स एशुन असून तो घानाचा रहिवासी आहे. घाना पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी त्याला अटक केली आहे. एशुनने स्वतःचे नाव एबो नोआ ठेवले आहे. पोलिसांच्या सायबर तपास पथकाने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
ख्रिसमसला महापूर होणार असल्याचा दावा
एबो नोआ तेव्हा चर्चेत आला, जेव्हा त्याने ऑगस्ट 2025 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो बायबलमधील ‘नोआच्या नौके’प्रमाणे नाव बांधत असल्याचे दिसत होते. त्याने दावा केला होता की, 25 डिसेंबर 2025 रोजी जगाचा अंत होणार असून प्रचंड पाऊस आणि महापूर येणार असल्याचे स्वतः देवाने त्याला सांगितले आहे. त्याच्या दाव्याने घाबरलेल्या शेकडो लोकांनी आपले घरदार सोडले होते.
नाट्यमय यूटर्न: ‘देवाने प्रलय टाळला’
मात्र, 25 डिसेंबर रोजी कोणताही महापूर न झाल्याने एबो नोआने पुन्हा एक व्हिडीओ जारी करत यूटर्न घेतला. त्याने म्हटले की, देवाशी पुन्हा माझा संपर्क झाला असून महापूर काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या नाट्यमय भूमिकेमुळे अनेकांनी त्याच्यावर प्रसिद्धीसाठी अफवा पसरवल्याचा आरोप केला होता.