डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:28 AM2020-01-17T02:28:13+5:302020-01-17T06:51:31+5:30

सिनेटमध्ये बहुमत असल्याने दोषी ठरून त्यांच्यावर हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यता कमी

Donald Trump will be impeached from Tuesday; Open hearing on two charges | डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी

Next

वॉशिंग्टन : अधिकारांचा गैरवापर व संसदेच्या कामात अडथळे या आरोपांवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोगाची कारवाई २१ जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरूहोईल. महाभियोगास सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत असल्याने महाभियोगात दोषी ठरून त्यांच्यावर हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यता कमी आहे.

ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव ‘हाऊस आॅफ रिप्रेझेन्टेटिव्हज’कडून आला आहे. त्या सभागृहात विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. त्या सभागृहाने ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाचे दोन आरोप निश्चित केले. त्या आरोपांवर संपूर्ण सिनेट न्यायालयाच्या भूमिकेतून सुनावणी करून ट्रम्प यांना दोषी ठरवायचे की, निर्दोष याचा निकाल देईल. या सुनावणीत अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् पीठासीन अधिकारी असतील, तर सिनेट सदस्य ‘ज्युरी’ची भूमिका बजावतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे सात सदस्य ‘प्रॉसिक्युटर’ म्हणून काम पाहतील.
महाभियोगासाठी ‘हाऊस आॅफ रिप्रेझेन्टेटिव्हज’ने ट्रम्पविरोधातातील आरोप सभापती नॅन्सी पेलोसी यांनी स्वाक्षरी करून बुधवारी सिनेटकडे पाठविले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कृतीने देशाची सुरक्षा धोक्यात आणली व पदाच्या शपथेचा भंग केला. महाभियोगाची वेळ यावी ही अमेरिकेसाठी खेदाची गोष्ट आहे. हे काम अप्रिय असले तरी निष्ठेने ते करावे लागेल व त्यात राष्ट्राध्यक्षांना नक्कीच जाब विचारला जाईल.

पीठासीन अधिकारी, प्रॉसिक्युटर व ज्युरी या सर्वांसाठी आरोपपत्राच्या मूळ प्रतींवर पेलोसी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दस्तऐवज समारंभपूर्वक मिरवणुकीने सिनेटकडे सुपूर्द करण्यात आला. सिनेटचे रिपब्लिकनचे नेते मिच मॅककॉनेल यांनी महाभियोगाचे वेळापत्रक जाहीर केले. गुरुवारी सिनेटमध्ये आरोपपत्राचे औपचारिक वाचन झाल्यानंतर सरन्यायाधीश रॉबर्टस् यांना पीठासीन अधिकारी म्हणून व सिनेट सदस्यांना ‘ज्युरी’ म्हणून शपथ देण्यात आली. अभियोगाच्या जाहीर सुनावणीच्या कामाचे टीव्हीवरून प्रक्षेपण केले जाईल. महाभियोगाचा कार्यक्रम जाहीर करताना मॅककॉनेल म्हणाले की, हा कठीण काळ आहे; पण असे प्रसंग हाताळण्यासाठी राष्ट्राचा पाया घालणाºया धुरीणांनी सिनेटची निर्मिती केली. हे सभागृह पक्षीय मतभेद व अल्पकालिक दृष्टिकोन बाजूला ठेवून राष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घेईल, याची मला खात्री वाटते. हे आपल्याला करावेच लागेल. 

नेमके काय आहेत आरोप?
अधिकारांचा व्यक्तिगत व पक्षीय स्वार्थासाठी गैरवापर. यंदा होणाºया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या स्पर्धेत स्पर्धक व म्हणूनच ट्रम्प यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. अमेरिकी सरकारने युक्रेनला ३९१ दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली होती; परंतु ट्रम्प यांनी जो बिडेन व त्यांच्या मुलाच्या युक्रेनमधील व्यावसायिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या काळात युक्रेन सरकारवर दबाव आणून मदतीची रक्कम प्रत्यक्ष अदा करणे रोखले. संसदेच्या कामकाजात अडथळे. ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या तयारीसाठी ‘हाऊस आॅफ रिप्रेझेन्टेटिव्हज’ने चौकशी सुरू केली. त्यासाठी सभागृहाने ट्रम्प प्रशासनाकडून काही कागदपत्रांची मागणी करून काही अधिकाऱ्यांना साक्षीसाठी समन्स काढली; परंतु ट्रम्प यांनी ही कागदपत्रे व साक्षीदार रोखून धरले.

Web Title: Donald Trump will be impeached from Tuesday; Open hearing on two charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.