अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:31 IST2025-05-24T06:30:07+5:302025-05-24T06:31:10+5:30
ॲपलचे टीम कूक यांना फार पूर्वीच कळवले आहे की, अमेरिकेमध्ये विकला जाणार आयफोन अमेरिकेतच उत्पादित झाला पाहिजे, भारत किंवा अन्य देशात नव्हे. असे होणार नसेल, तर ॲपलला अमेरिकेत २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल.

अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन: ॲपलने आयफोनचे उत्पादन अमेरिकेत न केल्यास अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनवर २५ टक्के आयात कर लावण्याचा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिला.
समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी हा इशारा दिला. तो प्रत्यक्षात आल्यास आयफोनच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढतील. त्यामुळे ॲपलची कंपनीची विक्री आणि नफ्यावर परिणाम होईल. अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून अनेक बड्या कंपन्यांवर दबाव आणला जात आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांना मी फार पूर्वीच कळवले आहे की, अमेरिकेमध्ये विकला जाणार आयफोन अमेरिकेतच उत्पादित झाला पाहिजे, भारत किंवा अन्य देशात नव्हे. असे होणार नसेल, तर ॲपलला अमेरिकेत २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल.
चीनपेक्षा भारतात पर्याय फायद्याचा
ॲपलच्या आयफोनचे मोठ्या प्रमाणात चीनमध्ये उत्पादन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर भरमसाट आयात कर लावल्यानंतर टीम कूक यांच्या नेतृत्वाखालील ॲपलने आयफोनचे उत्पादन चीनमधून भारतात हलविण्याच्या पर्यायावर विचार चालविला आहे. तथापि, ॲपलची ही योजना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पसंत पडलेला नाही. गेल्या सप्ताहात पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली होती.
२२ अब्ज डॉलर किमतीचे आयफोन ॲपलने भारतात मार्चपर्यंतच्या १२ महिन्यांत असेंबल केले, मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात जवळपास ६० टक्के वाढ झाली आहे.
भारतात विस्तारावर ॲपल ठाम
ॲपल कंपनी आयफाेनचे उत्पादन स्वत: करत नाही. ती मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांकडून उत्पादन करून घेते. फॉक्सकॉन ही ॲपलची प्रमुख उत्पादक कंपनी असून, फॉक्सकॉनचे भारतात प्रकल्प आहेत. ट्रम्प यांच्या विरोधानंतरही ॲपलने फॉक्सकॉनच्या भारतातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी आणखी आक्रमक भूमिका घेऊन २५ टक्के आयात कर लावण्याचा इशारा ॲपलला दिला.