'या' चार देशांशी सर्व संबंध तोडा, अन्यथा..; डोनाल्ड ट्रम्प यांची व्हेनेझुएलाला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:06 IST2026-01-07T17:05:15+5:302026-01-07T17:06:18+5:30
Donald Trump Warning To Venezuela: अमेरिकेच्या आक्रमणानंतर व्हेनेझुएलातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.

'या' चार देशांशी सर्व संबंध तोडा, अन्यथा..; डोनाल्ड ट्रम्प यांची व्हेनेझुएलाला धमकी
Donald Trump Warning To Venezuela: अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेने आता आणखी कठोर आदेश जारी करत, चीन, रशिया, इराण आणि क्युबा या चार देशांशी आर्थिक व धोरणात्मक संबंध कमी करण्याचे अट वजा आदेश जारी केला आहे. या निर्णयाचे पडसाद जागतिक भू-राजकारणासह आंतरराष्ट्रीय तेल बाजारातही उमटण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, व्हेनेझुएलाच्या नवीन हंगामी प्रमुख डेल्सी रोड्रिग्ज यांनी चीन, रशिया, इराण आणि क्युबासोबतचे आर्थिक संबंध तोडले, तरच देशाला अधिक प्रमाणात तेल उत्पादनाची परवानगी दिली जाईल.
एबीसी न्यूजच्या सूत्रांनुसार, ट्रंप प्रशासनाची मागणी आहे की, व्हेनेझुएलाने तेल उत्पादनासाठी फक्त अमेरिकेसोबत भागीदारी करावी आणि कच्च्या तेलाच्या विक्रीत अमेरिकेला प्राधान्य द्यावे. विशेष म्हणजे, चीन हा दीर्घकाळ व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार राहिला आहे.
जुने मित्र देश दूर करण्याचे आव्हान
व्हेनेझुएलाला चीनकडून गुंतवणूक व तंत्रज्ञान, रशियाकडून लष्करी सहकार्य, तर इराण आणि क्युबाकडून वैचारिक-रणनीतिक पाठबळ मिळत आले आहे. ह्युगो चाव्हेझ आणि मादुरो यांच्या काळात हे संबंध अधिक दृढ झाले होते. हे संबंध अचानक तोडणे म्हणजे व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र धोरणातील ऐतिहासिक ‘यू-टर्न’ ठरेल, ज्याचे परिणाम लॅटिन अमेरिका ते आशिया पर्यंत दिसू शकतात.
ट्रंप यांचा मोठा दावा : 50 मिलियन बॅरल तेल
6 जानेवारी 2026 रोजी ट्रम्प यांनी दावा केला की, व्हेनेझुएला अमेरिकेला 30 ते 50 मिलियन बॅरल तेल पुरवेल. सध्याच्या बाजारभावानुसार याची किंमत सुमारे 2.8 अब्ज डॉलर्स इतकी ठरू शकते. ट्रम्प यांनी हे तेल बाजारभावानेच विकले जाईल आणि त्यातून होणारा नफा दोन्ही देशांच्या फायद्यासाठी वापरला जाईल, असेही स्पष्ट केले. पुढील आठवड्यात अमेरिकन तेल कंपन्यांसोबत व्हेनेझुएलामधील गुंतवणुकीबाबत चर्चा होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
राजकीय अस्थिरतेत सापडलेला व्हेनेझुएला
अमेरिकेच्या कारवाईनंतर व्हेनेझुएला तीव्र राजकीय अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे. निकोलस मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्कला नेण्यात आल्यानंतर डेल्सी रोड्रिग्ज यांनी हंगामी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, ट्रम्प यांनी दक्षिण अमेरिकेतील या देशावर आपलाच प्रभाव असल्याचा दावा केल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.