ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 07:11 IST2025-08-01T07:11:16+5:302025-08-01T07:11:16+5:30
बेरोजगारीतही होणार भरमसाट वाढ! जेपी मॉर्गन संस्थेचाही दुजोरा

ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेल्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कुटुंबाला दरवर्षी सरासरी सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा येल विद्यापीठातील द बजेट लॅब या संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे संचालक एर्नी टेडेस्ची यांनी आपल्या “स्टेट ऑफ यूएस टॅरिफ्स : ३० जुलै २०२५” या अहवालात दिला आहे.
यामुळे अमेरिकेतील गरिबांवर सर्वाधिक भार पडणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. म्हणजेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची किंमत सर्वसामान्य अमेरिकन कुटुंबांना स्वतःच्या खिशातून मोजावी लागणार आहे. हा अहवाल ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ जाहीर केल्याच्या दिवशीच प्रसिद्ध झाला आहे.
जेपी मॉर्गन संस्थेचाही दुजोरा
जेपी मॉर्गनच्या अहवालातही द बजेट लॅबच्या अहवालातील निष्कर्षांना दुजोरा देण्यात आला आहे. टॅरिफमुळे ग्राहकांना अधिक पैसा खर्च करावा लागणार असून यामुळे देशाची आर्थिक वाढ मंदावत असल्याचे जेपी मॉर्गनने म्हटले आहे. टॅरिफमुळे २०२५ मध्ये १६,७७० कोटी रुपयांचा महसूल मिळेल, पण, कुटुंबांवर पडणारा भार अधिक असणार आहे.
वाढती व्यापार तूट : टॅरिफद्वारे व्यापार तूट कमी करण्याचे ट्रम्प यांचे उद्दिष्ट होते, मात्र यामुळे ती अधिकच वाढली आहे.
अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम
गरीब कुटुंब १.०८ लाख रु.
सरासरी प्रतिकुटुंब २ लाख रु.
उच्च उत्पन्न गट ४.१५ लाख रु.
काँग्रेस बजेट ऑफिसची चिंता : अध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिच्या पूर्ण क्षमतेइतकी वाढू शकणार नाही, अशी चिंता अमेरिकेच्या काँग्रेस बजेट ऑफिसनेदेखील व्यक्त केली आहे.
अमेरिकेत महागणाऱ्या वस्तू
लेदरच्या वस्तू ४०%
तयार कपडे ३८%
कापड १९%
नवीन कार १२.३%
भाज्या-फळे ७%
अन्नपदार्थ ३.४%