दुबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अचानकपणे पुढील ५ दिवसांसाठी इराणच्या वीज प्रकल्पांवर अमेरिकेकडून होणारे प्रस्तावित हल्ले स्थगित होत असल्याचे घोषित केले. आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या वेबसाइटवर इराणशी अतिशय चांगल्या आणि फलदायी चर्चा झाल्या. त्या चर्चांमुळे युद्धावर पूर्ण आणि सर्वंकष तोडगा निघू शकतो. या चर्चा संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. हे हल्ले स्थगित करण्याचा निर्णय चालू बैठका आणि चर्चांच्या यशावर अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही तासांतच इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर इराणच्या ठाम इशाऱ्यांमुळे अमेरिकेने माघार घेतली, असा संदेश प्रसारित करण्यात आला. इराणच्या ‘इर्ना’ या वृत्तपत्राने मात्र कोणत्याही चर्चेचे खंडन करत ट्रम्प यांचे वक्तव्य ऊर्जा दर कमी करण्यासाठी आणि लष्करी योजना राबवण्यासाठी वेळ मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले ट्रम्प?
युद्धविरामाबाबत इराण करार करण्यास इच्छुक. इराणशी सुमारे १५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती.इराणने अण्वस्त्र न विकसित करण्याचे मान्य केले. अमेरिकेचा प्रतिनिधीची इराणी नेत्याशी चर्चा. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी रविवारी उशिरापर्यंत चर्चा केली. इराणमधील कोणाशी चर्चा केली याची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोज्तबा खामेनेई यांच्याशी थेट चर्चा झालेली नाही. करार झाल्यास इराणच्या अणु कार्यक्रमातील समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
“मला कळवताना आनंद होत आहे की, अमेरिका आणि इराण या देशांनी गेल्या दोन दिवसांत मध्यपूर्वेतील परस्परांमधील शत्रुत्व पूर्णपणे आणि सर्वंकषपणे संपविण्याबाबत अतिशय चांगल्या आणि फलदायी चर्चा केल्या आहेत. या सखोल, तपशीलवार आणि रचनात्मक चर्चांचा एकूण सूर आणि वातावरण लक्षात घेता- आणि या चर्चा संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असल्याने-मी युद्ध खात्याला इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय चालू असलेल्या बैठका आणि चर्चांच्या यशावर अवलंबून असेल. या बाबीकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. - डोनाल्ड जे. ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
‘ब्लॅक मंडे’ सेन्सेक्स १,८३६ अंकांनी क्रॅश
मुंबई : युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका शेअर बाजाराला बसला. सोमवारी सेन्सेक्स १,८३७ अंकांनी घसरत ७२,६९६ वर बंद झाला. निफ्टी ६०१.८५ अंकांनी घसरून २२,५१२.६५ वर आला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या १६ सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे ४८.७२ लाख कोटी रुपये बुडाले असून, एकूण मार्केट कॅप आता ४१५ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.
११ टक्क्यांनी सेन्सेक्स क्रॅश
२८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत सेन्सेक्स ८,५९० अंकांनी (१०.५६%) घसरला आहे, तर निफ्टी २,६६६ अंकांनी (१०.५८%) खाली आला आहे. बाजारातील अस्थिरता पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.
सोन्यात दशकांतील विक्रमी घसरण
सोमवारी सोन्याच्या दरात तब्बल ९,०५० रुपयांची घसरण होऊन ते १.४३ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर आले, तर चांदीही १०,५०० रुपयांनी घसरून २.३० लाख रुपये प्रति किलोवर आली आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याचे दर १० टक्क्यांहून अधिक कोसळले असून, ही घसरण चार दशकांतील सर्वात मोठी मानली जाते. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या सोन्याला मोठा फटका बसला आहे.
दोन भारतीय एलपीजी जहाजे भारताकडे रवाना
नवी दिल्ली : भारतीय ध्वज असलेली ‘पाइन गॅस’ व ‘जग वसंत’ नावाची दोन एलपीजी जहाजे युद्धग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताकडे रवाना झाली आहेत. या दोन्ही जहाजांवर मिळून ९२ हजार टन एलपीजी आहे. ही जहाजे पुढील दोन ते अडीच दिवसात भारतीय बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. ही जहाजे सोमवारी सकाळी आखातातून निघाली. या जहाजांवरील एलपीजीचा साठा देशातील एका दिवसाच्या स्वयंपाक गॅसच्या गरजेएवढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Web Summary : Trump suspended Iran attacks for five days amid promising talks. Iran denies discussions, while markets crashed due to war uncertainty. LPG ships safely sailed to India.
Web Summary : ट्रम्प ने ईरान पर हमले पांच दिनों के लिए स्थगित किए। ईरान ने वार्ता से इनकार किया, युद्ध की अनिश्चितता से बाजार धराशायी। एलपीजी जहाज सुरक्षित रूप से भारत रवाना।