पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:15 IST2025-07-31T16:14:59+5:302025-07-31T16:15:41+5:30
ट्रम्प यांनी पहिल्या कारकिर्दीत आणि बायडन यांच्या काळात अमेरिकेने भारताला दक्षिण आशियात आपला प्रमुख भागीदार म्हणून प्राधान्य दिले. ज्यामुळे अमेरिकेचे पाकिस्तानसोबत संबंध बिघडले.

पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ज्यानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण पाहायला मिळाली. बुधवारी टॅरिफची घोषणा करताना ट्रम्प यांनी भारताला मित्र म्हणून संबोधत भारतासोबत आमचा व्यापार घसरला आहे. ते आमच्याशी कमी व्यवसाय करतात असं म्हटलं. मात्र दुसरीकडे ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल साठ्याबाबत महत्त्वाची डील केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक नवीन करार केला आहे, ज्याअंतर्गत दोन्ही देश पाकिस्तानच्या प्रचंड तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करतील. हा करार पुढे नेण्यासाठी एका तेल कंपनीची निवड केली जात आहे. त्यामुळे कदाचित एकदिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल असं विधान त्यांनी केले. अलीकडच्या काळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात चढउतार दिसून आले. ट्रम्प यांनी पहिल्या कारकिर्दीत आणि बायडन यांच्या काळात अमेरिकेने भारताला दक्षिण आशियात आपला प्रमुख भागीदार म्हणून प्राधान्य दिले. ज्यामुळे अमेरिकेचे पाकिस्तानसोबत संबंध बिघडले. परंतु आता अमेरिकेने त्यांचे लक्ष पाकिस्तानच्या दिशेने वळवले आहे.
चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न?
पाकिस्तान चीनचा महत्त्वाचा भागीदार आहे. विशेष म्हणजे चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर हा बेल्ट अँन्ड रोड इनिशिएटिव्हचा भाग आहे. हा प्रकल्प पाकिस्तानला आर्थिक मदत आणि सैन्य मदत देणारा आहे. आता अमेरिका तेल कराराच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. हा करार अमेरिकेच्या त्या रणनीतीचा भाग आहे ज्या अंतर्गत तो चीनचा पाकिस्तानातील वाढता प्रभाव नियंत्रणात आणू इच्छितो. केवळ पाकिस्तानच नाही तर ट्रम्प म्यानमारही मेहरबान आहेत. म्यानमारमधील अमेरिकेचे धोरण बदलण्याचा ट्रम्प विचार करत आहेत. येणाऱ्या काळात ट्रम्प म्यानमारसोबत सैन्य करार करू शकते आणि तिथल्या दुर्मिळ अशा नैसर्गिक संपत्तीवर नियंत्रण ठेवू शकते असं सांगण्यात येते.
दरम्यान, अमेरिका म्यानमारला प्रस्तावित ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफ सूट देण्याचा विचार करत आहे. प्रतिबंध परत घेणे, रेयर अर्थ डिप्लोमेसीवर काम करण्यासाठी विशेष दूताची नियुक्ती करणे यासारखी पावले अमेरिका उचलू शकते. दक्षिण आशियातील डोनाल्ड ट्रम्प यांची ही निती चीनचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेली पाऊले म्हणून पाहिली जात आहेत. कारण सध्या चीन या भागात वेगाने पाय रोवत आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत तेल करार, म्यानमारसोबत सैन्य सहकार्य यावरून ट्रम्प यांचं धोरण स्पष्ट दिसून येत आहे.