"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:26 IST2025-07-15T19:25:28+5:302025-07-15T19:26:07+5:30
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात ही चर्चा ४ जुलै २०२५ रोजी झाली आहे...

"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
रशिया युक्रेन युद्ध आता एका नव्या वळणावर जाताना दिसत आहे. आधी युद्ध थांबवण्याची भाषा करत असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आता, युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्या साथीने रशियावरील हल्ले आणखी तीव्र करण्याच्या योजना आखताना दिसत आहेत. युक्रेनने रशियाच्या हद्दीत हल्ले वाढवावेत, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यांनी झेलेन्स्की यांना थेट प्रश्न केला की, आपण मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?
शस्त्रास्ते मिळाली तर नक्की हल्ला करू -
फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना थेट प्रश्न केला की, "आपण मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवरही हल्ला करू शकता का?" ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात ही चर्चा ४ जुलै २०२५ रोजी झाली आहे. ट्रम्प यांच्या या प्रश्नाच्या उत्तर देताना झेलेन्स्की म्हणाले, "जर आम्हाला शस्त्रास्त्रे दिली गेली, तर आम्ही निश्चितपणे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकतो.
पुतिन यांना वाटाघाटीसाठी भाग पाडू इच्छितात ट्रम्प -
ट्रम्प यांनी युक्रेनला रशियात घुसून घातक हल्ले करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. असे केल्यास क्रेमलिन वाटाघाटी करण्यास तयार होईल, असे ट्रम्प यांना वाटते. मात्र, अमेरिका खरो खरच युक्रेनला लांब पल्ल्याची शस्त्रे पुरवणार का? हे अद्याप स्पष्ट नाही.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (१४ जुलै २०२५) युक्रेनसाठी नव्या शस्त्रास्त्रांची घोषणा केली. तसेच, जर रशियाने ५० दिवसांत शांतता करारावर सहमती दर्शवली नाही, तर रशियन निर्यातीच्या खरेदीदारांवर निर्बंध लादण्यात येतील, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.