ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:57 IST2026-01-08T10:48:20+5:302026-01-08T10:57:29+5:30
शेजारील देश असलेल्या बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हिंसेचा वणवा पेटला आहे.

ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
शेजारील देश असलेल्या बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हिंसेचा वणवा पेटला आहे. बुधवारी (७ जानेवारी) रात्री ढाका येथील गजबजलेल्या करवान बाजार परिसरात 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'शी संबंधित माजी नेते अजीजुर रहमान मुसब्बिर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली असून संतप्त समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.
भरवस्तीत गोळीबार, पोटात लागली गोळी
अजीजुर रहमान मुसब्बिर हे 'स्वयंसेवक दला'चे माजी नेते होते. बुधवारी रात्री ८:३० च्या सुमारास ते पंथापथ भागातील ग्रीन रोडवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. मुसब्बिर यांच्या पोटात गोळ्या लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने बीआरबी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर ढाका मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
जनतेचा संताप, लष्कराचा हस्तक्षेप
हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच करवान बाजार परिसरात तणाव निर्माण झाला. शेकडो निदर्शकांनी सार्क फाऊंटन चौक जाम केला, ज्यामुळे राजधानीतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस आणि लष्कराच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा लष्कराने हस्तक्षेप करून आंदोलकांना रस्त्यावरून हटवले, मात्र परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे.
निवडणुकांपूर्वी 'टार्गेट किलिंग'चा ससेमिरा
बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुसब्बिर यांच्या आधी विद्यार्थी नेते उस्मान शरीफ हादी यांचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. राजकीय द्वेषातून या हत्या केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
हल्लेखोर अद्याप फरार
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अनेक राऊंड फायरिंग करत घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ढाकासह अनेक शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.