Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 07:48 IST2025-11-19T07:48:12+5:302025-11-19T07:48:48+5:30
Delhi Blast Updates, Bangladesh Connection : लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे बांगलादेश कनेक्शन उघड झाले आहे

Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
Delhi Blast Updates: १० नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. तपास यंत्रणा दररोज छापे टाकत आहेत. सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी या हल्ल्याचे बांगलादेशश कनेक्शन (Bangladesh Connection) शोधून काढले आहे. अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असलेल्या बांगलादेशी नागरिक इख्तियारला तपास यंत्रणांनी अटक केली आहे. सुरक्षा यंत्रणांचा असा अंदाज आहे की, इख्तियारनेच स्फोटात वापरलेली स्फोटके दिल्लीला पोहोचवली होती. बांगलादेश सरकार हे आरोप नाकारत असले तरीही याबाबत तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आता इख्तियार बांगलादेशची पोलखोल करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
बांगलादेशने आरोप नाकारले, तरीही पुरावे सापडले
इख्तियारच्या अटकेनंतर भारत-बांगलादेश सीमेवरील पश्चिम बंगालमधील मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांवर तपास केंद्रित झाला आहे. तिथे कट्टरपंथी नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय आहे. याचदरम्यान, ढाका सरकारने आरोप नाकारले आहेत, पण तरीही अनेक पुरावे सापडले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम युनूस सरकारने दावा केला आहे की बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांच्या भूभागाचा वापर झाला नव्हता. पण भारतीय एजन्सींना जे पुरावे सापडले आहेत, त्यातून काही वेगळीच माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत इख्तियारचा जबाब बांगलादेशचे पितळ उघडं पाडण्यास मदत करू शकेल.
तपासात काय पुरावे आढळले?
तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात बांगलादेशी दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) यांच्यात ऑनलाइन बैठका झाल्याचे निष्पन्न झाले. मालदा-मुर्शिदाबादमध्ये हालचालींना वेग आला होता. स्फोटाच्या काही दिवस आधी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्लाह सैफ बांगलादेशी अधिकाऱ्यांना भेटला होता. या माहितीवरून असे दिसून येते की दिल्लीतील बॉम्बस्फोट हा केवळ स्थानिक कारवाई नव्हता, तर तो पाकिस्तान-बांगलादेशमधून चालवल्या जाणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा भाग होता.
पाकिस्तान-बांगलादेशचा हायब्रीड दहशतवाद
सूत्रांच्या माहितीनुसार, भारताला गुंतागुंतीच्या दहशतवादी धोक्याचा सामना करावा लागत आहे. दिल्ली हल्ल्यात आयएसआय त्याचा मास्टरमाइंड आहे. पाकिस्तान-बांगलादेश नेटवर्क सक्रिय झाले आहे. आणि व्हाईट कॉलर, डिजिटल आणि कॅम्पस-आधारित मॉड्यूल्स उदयास येत आहेत. पश्चिम बंगालसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये हा धोका अधिक आहे. दहशतवाद्यांचे ध्येय केवळ जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान करणे नाही, तर भारताची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांना कमकुवत करणे आहे, असे तपासात निष्पन्न होत आहे.