दलाई लामांचे नाव 'एपस्टीन फाईल्स'मध्ये? कार्यालयाने दिले सडेतोड उत्तर; पेमा खांडूही संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:32 IST2026-02-09T13:31:29+5:302026-02-09T13:32:04+5:30
आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचे नाव कुख्यात जेफ्री एपस्टीनशी जोडणाऱ्या अफवांनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

दलाई लामांचे नाव 'एपस्टीन फाईल्स'मध्ये? कार्यालयाने दिले सडेतोड उत्तर; पेमा खांडूही संतापले
आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचे नाव कुख्यात जेफ्री एपस्टीनशी जोडणाऱ्या अफवांनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. मात्र, दलाई लामा यांच्या कार्यालयाने या वृत्ताचे जोरदार खंडन केले असून, हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. या वादात आता अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही उडी घेतली असून, त्यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये अमेरिकेतील वादग्रस्त फायनान्सर जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित कागदपत्रांमध्ये दलाई लामांचे नाव असल्याचा दावा केला जात होता. या दाव्यांमुळे जगभरातील त्यांच्या अनुयायांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
दलाई लामा कार्यालयाचे स्पष्टीकरण
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दलाई लामा यांच्या कार्यालयाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, "१४ वे दलाई लामा कधीही जेफ्री एपस्टीनला भेटलेले नाहीत. तसेच त्यांनी आपल्या वतीने कोणालाही त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत केलेले नाही. माध्यमांतील हे वृत्त पूर्णपणे दिशाभूल करणारे असून, कोणत्याही तथ्याशिवाय आध्यात्मिक नेत्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे."
मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा संताप
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, "दलाई लामा ही एक पवित्र संस्था आहे. अशा पूजनीय व्यक्तिमत्त्वाला निराधार आणि दुर्भावनापूर्ण वादात ओढणे अत्यंत निंदनीय आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे आध्यात्मिक संस्थेची बदनामी करणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे."
कोण होता जेफ्री एपस्टीन?
जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन अब्जाधीश होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याने आत्महत्या केली होती. अमेरिकन न्याय विभागाने अलीकडेच त्याच्याशी संबंधित लाखो कागदपत्रे, व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करण्यास सुरुवात केली आहे. याला 'एपस्टीन फाईल्स' म्हटले जात आहे. यामध्ये जगातील अनेक बड्या नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत, ज्याचा फायदा घेत काही घटकांनी दलाई लामांचे नाव यात ओढण्याचा खोडसाळ प्रयत्न केला आहे.