coronavirus: 'कोविड-१९'वर लस यायला २०२१ उजाडणार, पण काळजी करू नका; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:36 AM2020-05-16T05:36:44+5:302020-05-16T11:25:42+5:30

कोणतीही लस शोधून काढण्यासाठी काही वर्षे जातात. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यातील काही जणांनी तयार केलेली लस रुग्णांना टोचल्यानंतर रोग हटविण्यासाठी ती प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

coronavirus: Coronavirus drugs will be available in a few months, the vaccine will be ready next year | coronavirus: 'कोविड-१९'वर लस यायला २०२१ उजाडणार, पण काळजी करू नका; कारण...

coronavirus: 'कोविड-१९'वर लस यायला २०२१ उजाडणार, पण काळजी करू नका; कारण...

Next

लंडन : कोरोना साथीवर उपचार करण्याकरिता संशोधनातून तयार केलेली औषधे येत्या काही महिन्यांत उपलब्ध होतील तसेच या आजारावरील लसीला पुढच्या वर्षी २०२१ मध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असे युरोपियन मेडिसिन एजन्सीने म्हटले आहे. या संस्थेच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. मार्को कावलेरी यांनी सांगितले की, कोरोनावरील उपचारांकरिता तयार केलेल्या औषधांना मान्यता देण्याची प्रक्रिया यंदाच्या उन्हाळ्यानंतर पार पडेल. रेमडिसिव्हिर या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते असे त्यासंदर्भात केलेल्या चाचण्यांमध्ये दिसून आले होते. मात्र या औषधाबाबत आणखी संशोधन होणे बाकी आहे.

ते म्हणाले की, कोणतीही लस शोधून काढण्यासाठी काही वर्षे जातात. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यातील काही जणांनी तयार केलेली लस रुग्णांना टोचल्यानंतर रोग हटविण्यासाठी ती प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मात्र या लसीबाबतचे सर्व प्रयोग पूर्ण झाल्यानंतर जो निष्कर्ष हाती येईल, तोच अत्यंत महत्त्वाचा असतो. कोरोना प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाची लस शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही, असेही डॉ. मार्को कावलेरी म्हणाले. (वृत्तसंस्था)

लस शोधण्यासाठी हवे एकजुटीने प्रयत्न
कोरोना साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन १४० संशोधक व विविध देशांच्या प्रमुखांनी गुरु वारी केले. त्यामध्ये नोबेल पुरस्कारविजेते संशोधक जोसेफ स्टिग्लित्झ, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे. ही लस शोधल्यानंतर ती सर्व देशांना उपलब्ध करून द्यावी. जगातील सर्व कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, असे या मान्यवरांनी म्हटले आहे.

कोरोनासंदर्भातील संशोधन प्रकल्पांना १०० कोटींचा निधी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी प्रतिबंधक लस शोधण्यासह, याच आजाराबद्दलच्या अन्य संशोधन प्रकल्पांना पीएम-केअर्स निधीतून १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. देशभरात २५ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप कंपन्यांचा सहभाग असल्याचे केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. विज्ञानविषयक प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीचे वितरण व वापर केला जाईल. केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले की, १०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर कसा व्हावा, याची रूपरेषा येत्या काही दिवसांत ठरविली जाईल. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या टास्क फोर्सच्याही डॉ. रेणू स्वरूप सदस्या आहेत.

Web Title: coronavirus: Coronavirus drugs will be available in a few months, the vaccine will be ready next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.